पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत सहाव्या दिवशी पहिल्या लढतीत विशांत मोरे ६८धावा) व मेहुल पटेल(४५धावा)यांनी केलेल्या भागीदारीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स संघाचा १३ धावांनी पराभव करत दुसरा विजय मिळवला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूर टस्कर्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रायगड रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २०षटकात ७बाद १८५धावा केल्या. नौशाद शेख(०)खाते न उघडताच तंबूत परतला. त्यापाठोपाठ सिद्धेश वीर(२०), रोहन मारवाह(१०)हे वरच्या फळीतील फलंदाज पॉवरप्ले संपेपर्यंत झटपट बाद झाले. त्यावेळी ३बाद ५७ अशी स्थिती होती. विशांत मोरे व मेहुल पटेल यांनी चौथ्या विकेटसाठी ६०चेंडूत ९३ धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. विशांत मोरेने ४७चेंडूत ६८धावांची झंझावती खेळी करून सामन्यात रोमांच आणला. त्यात त्याने ६चौकार व २षटकार खेचले. त्याला मेहुल पटेलने ३१चेंडूत ५चौकार व १ षटकारासह ४५धावांची खेळी करून साथ दिली. कोल्हापूरच्या फिरकीपटू श्रेयस चव्हाणने स्वतःच्या गोलंदाजीवर विशांत मोरेला झेल बाद केले. तर, श्रीकांत मुंढेने मेहुल पटेलला आक्रमक फटका मारताना झेल बाद केले. त्यानंतर ऋषभ राठोडने नाबाद २६ धावांची खेळी करून रायगड रॉयल्स संघाला १८५धावांचे आव्हान उभे करून दिले. कोल्हापुर टस्कर्सकडून निहाल तुसामत(२-२९), योगेश डोंगरे(२-१९), तरणजित धिल्लोन(१-१४), श्रीकांत मुंढे(१-३३), श्रेयस चव्हाण(१-३३) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
१८५धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाला निर्धारित षटकात सर्वबाद सलामीचा फलंदाज हर्ष संघवी(२धावा)तंबूत परतला. कर्णधार राहुल त्रिपाठीने १९चेंडूत ४६धावांची आक्रमक खेळी केली. त्यात त्याने ५चौकार व ३षटकार खेचले. त्याला अंकित बावणेने ४३चेंडूत ५चौकारांसह ५१धावांची अर्धशतकी खेळी करून साथ दिली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ४९चेंडूत ८९ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. हे दोघेही एका पाठोपाठ बाद झाल्यावर कोल्हापूर टस्कर्स च्या फलंदाजांची घसरकुंडी झाली. अवघ्या ७२ धावात त्यांचे ९गडी बाद झाले. त्यांचा डाव १७२धावांवर संपुष्टात आला.
संक्षिप्त धावफलक
रायगड रॉयल्स: २०षटकात ७बाद १८५धावा(विशांत मोरे ६८(४७,६x४,२x६), मेहुल पटेल ४५(३१,५x४,१x६), सिद्धेश वीर २०, ऋषभ राठोड नाबाद २६, रोहन मारवाह १०, निहाल तुसामत २-२९, योगेश डोंगरे २-१९, तरणजित धिल्लोन १-१४, श्रीकांत मुंढे १-३३, श्रेयस चव्हाण १-३३)वि.वि.पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स: १९.५ षटकात सर्वबाद १७२धावा(अंकित बावणे ५१(४३,५x४), राहुल त्रिपाठी ४६(१९,५x४,३x६),अनिकेत पोरवाल २१, सचिन धस १२, मनोज इंगळे ३-४७, निखिल कदम २-३२, तनय संघवी २-३५, विकी ओस्तवाल १-२१);सामनावीर – विशांत मोरे.
आजचे सामने:
८ जून पीबीजी कोल्हापूर टस्कर्स वि. छत्रपती संभाजी किंग्ज दु. २ वा
८ जून रत्नागिरी जेट्स वि. ईगल नाशिक टायटन्स सायं. ७ वा