भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली ज्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला होता. येत्या ३ डिसेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मालिकेतील दुसरा कसोटी सामना पार पडणार आहे. हा सामना मालिकेच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असेल. कारण हा सामना जिंकणारा संघ मालिका आपल्या नावावर करेल. तसेच न्यूझीलंड संघाला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. परंतु न्यूझीलंड संघासाठी हे आव्हान सोपे नसेल. कारण मुंबईची खेळपट्टी ही कानपुरच्या खेळपट्टीपेक्षा वेगळी असणार आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पार पडणार आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन होत असल्यामुळे भारतीय संघाची ताकद आणखी वाढणार आहे. यापूर्वी मुंबईची खेळपट्टी न्यूझीलंड संघाची चिंता वाढवू शकते. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीत म्हटले की, “वानखेडेची खेळपट्टी पहिल्या दिवसापासूनच फिरकी गोलंदाजांना मदत करेल. फिरकी गोलंदाजी हा भारतीय संघाचा मजबूत पक्ष आहे. त्यामुळे आम्ही फिरकी गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी तयार करण्यात व्यस्त आहोत.”
फिरकी गोलंदाजी ही न्यूझीलंड संघाची कमजोर बाजू मानली जाते. कानपूर कसोटीत त्यांनी विल समरविलला संधी दिली होती. हा त्याच्या कारकीर्दीतील ५ वा सामना होता. तर भारतातील पहिलाच कसोटी सामना होता. तर एजाज पटेलचा देखील हा कारकिर्दीतील १० वा आणि भारतातील पहिला कसोटी सामना होता. एजाज पटेलने ३ गडी बाद केले. परंतु मोबदल्यात त्याने १५० धावा खर्च केल्या. त्यामुळे न्यूझीलंड संघाला या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर फिरकी गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
तसेच बुधवारी (१ डिसेंबर) आणि गुरुवारी (२ डिसेंबर) मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता आहे.मात्र सामन्यादरम्यान हवामान चांगले राहण्याची अपेक्षा आहे. असे असले तरी मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी हवामान हे चिंतेचे मोठे कारण आहे. पाऊस पडल्यास त्यांना पुन्हा खेळपट्टीवर पाणी टाकण्याची संधी मिळणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.






