भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहे. नुकत्याच संपलेल्या इंग्लंड दौऱ्यावर चार कसोटी सामन्यात तो सपशेल अपयशी ठरला. चार सामन्यांच्या आठ डावात त्याला केवळ एक अर्धशतक झळकावता आले. रहाणेच्या या खराब कामगिरीनंतर अनेक जण त्याला संघातून वगळण्यात यावे अशी मागणी करत आहेत. मात्र, भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने रहाणेची पाठराखण करत, त्याला संघातून केव्हा बाहेर करावे याबाबत वक्तव्य केले आहे.
तेव्हाच रहाणेला संघाबाहेर करावे
वीरेंद्र सेहवाग याने प्रसारण वाहिनीशी बोलताना अजिंक्य रहाणेबाबत म्हटले,
“मला वाटते रहाणेला संघाबाहेर करण्याची ही वेळ नव्हे. एका विदेशी दौर्यात अपयशी ठरल्यामुळे त्याला बाहेर करणे योग्य नाही. न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेत त्याला संधी द्यायला हवी. तेथे तो अपयशी ठरल्यास त्याची संघात जागा बनणार नाही.”
सेहवाग पुढे म्हणाला,
“विदेश दौरे हे अधूनमधून होत असतात. मात्र, भारतात तुम्ही दरवर्षी खेळता. तुम्ही येथे धावा बनवणे गरजेचे आहे. मी अनेक महान खेळाडू पाहिले आहेत की, ज्यांनी ८-९ कसोटी सामन्यांमध्ये काहीच केले नाही. त्यांच्या बॅटमधून अर्धशतकही आले नव्हते. पण, त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी एका वर्षात १२०० ते १५०० कसोटी धावा केल्या.”
अजिंक्य रहाणेने पहिल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याच्या बॅटमधून ११५९ धावा आल्या. मात्र, मेलबर्न कसोटीत शतकापासून रहाणेची बॅट शांत असून त्याची फलंदाजीची सरासरी फक्त १९.८६ आहे.
इंग्लंड दौऱ्यात अपयशी
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला असताना रहाणे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. मात्र, त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत लॉर्ड कसोटीतील एकमेव अर्धशतक वगळता त्याला धावा बनवण्यासाठी झगडावे लागले. त्यामुळे अनेक क्रिकेट समीक्षकांनी त्याला भारतीय संघातून बाहेर काढावे अशी मागणी केली होती.