सध्या विम्बल्डन स्पर्धा 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतून मोठी बातमी समोर येत आहे. जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्बियन टेनिसपटू नोवाक जोकोविच शानदार प्रदर्शन करत आहे. नोवाक जोकोविच विम्बल्डन स्पर्धा 2023मध्ये पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. शुक्रवारी (दि. 14 जुलै) लंडन येथे खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात जोकोविचने इटलीच्या यानिक सिन्नर याचा पराभव केला. 2 तास 47 मिनिटे चाललेल्या या सामन्यात जोकोविचने सिन्नरला 6-3, 6-4, 7-6 (4) अशा सेटमध्ये पराभूत केले.
जोकोविच 35व्यांदा ग्रँड स्लॅम अंतिम सामन्यात
उपांत्य सामन्यात यानिक सन्नर (Jannik Sinner) याचा पराभव करत नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याने अंतिम सामन्यात धडक दिली. विशेष म्हणजे, ग्रँड स्लॅम अंतिम सामन्यात पोहोचण्याची जोकोविचची ही 35वी वेळ होती. यासोबतच जोकोविच सलग तिसऱ्या ग्रँड स्लॅम अंतिम सामन्यात पोहोचला आहे. यावर्षी त्याने ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपन अंतिम सामन्यातही प्रवेश केला होता. या दोन्ही स्पर्धांचे विजेतेपद पटकावण्यात त्याला यश आले होते.
जोकोविचचा सामना जागतिक अव्वल मानांकित खेळाडूशी
उपांत्य सामन्यात जोकोविचला सिन्नरविरुद्ध पहिले दोन सेट जिंकण्यात फार संघर्ष करावा लागला नाही. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. तसेच, सामना टायब्रेकरपर्यंत झाला. यामध्ये जोकोविचने बाजी मारत सामना आपल्या नावावर केला. अंतिम सामन्यात जोकोविचचा सामना जागतिक अव्वल मानांकित स्पेनच्या कार्लोस अल्कारेज याच्याशी होणार आहे. अल्कारेजने दुसऱ्या उपांत्य सामन्यात डॅनियल मेदवेदेव याला 6-3, 6-3, 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले.
Novak Djokovic has become the first player in history to reach 35 Grand Slam singles finals 🤯#Wimbledon | @DjokerNole pic.twitter.com/8NYR6dTEdy
— Wimbledon (@Wimbledon) July 14, 2023
नोवाक जोकोविच पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेत सर्वाधिक वेळा ग्रँड स्लॅम जिंकणारा खेळाडू आहे. जोकोविचने आतापर्यंत 23वेळा ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. तो स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल (Rafael Nadal) याच्या 22 किताबांपेक्षा एक पाऊल पुढे आहे. जोकोविचने मागील महिन्यात फ्रेंच ओपन 2023 (French Open 2023) स्पर्धेचा किताब जिंकून नदालला पछाडले होते. जोकोविच आता 8व्यांदा विम्बल्डन किताब पटकावण्याचा प्रयत्न करेल. स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 16 जुलै) खेळला जाणार आहे. (Serbian star tennis player novak djokovic in wimbledon 2023 final after beating jannik sinner of italy grand slam tennis)
सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारे टेनिसपटू (पुरुष एकेरी)
23- नोवाक जोकोविच (सर्बिया), (ओपन- ऑस्ट्रेलियन-10, फ्रेंच-3, विम्बल्डन-7, यूएस-3)
22- राफेल नदाल (स्पेन), (ओपन- ऑस्ट्रेलियन-2, फ्रेंच-14, विम्बल्डन-2, यूएस-4)
20- रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड), (ओपन- ऑस्ट्रेलियन-6, फ्रेंच-1, विम्बल्डन-8, यूएस-5)
14- पीट सॅम्प्रास (अमेरिका), (ओपन- ऑस्ट्रेलियन-2, फ्रेंच-0, विम्बल्डन-7, यूएस-5)
सर्वाधिक ग्रँड स्लॅम अंतिम सामन्यात पोहोचणारे टेनिसपटू (पुरुष एकेरी)
34- नोवाक जोकोविच*
31- रॉजर फेडरर
30- राफेल नदाल
19- इवान लेंडल
18- पीट सॅम्प्रास
महत्वाच्या बातम्या-
विम्बल्डनचा पहारेकरी आहे ‘हा’ ससाणा! 15 वर्षांपासून करतोय टेनिस कोर्टचे रक्षण; वाचा सविस्तर
टेनिसचा ‘युगंधर’ बनला जोकोविच! फ्रेंच ओपनसह 23वे ग्रँडस्लॅम केले नावे