सिडनी। आज(7 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे.
याबरोबरच पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका ऑस्ट्रेलियन भूमीत जिंकण्याचा इतिहास रचला आहे.
त्याचबरोबर भारत हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकणारा पहिला आशियाई संघ ठरला आहे. तसेच भारताचा कर्णधार विराट हा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे.
भारताची ऑस्ट्रेलियन भूमीतील ही 12 वी कसोटी मालिका होती. मागील 11 कसोटी मालिकांपैकी भारताने 8 मालिकांमध्ये पराभव स्विकारला आहे तर 3 मालिकांमध्ये बरोबरी केली आहे.
भारताने आत्तापर्यंत 9 संघाविरुद्ध विदेशात कसोटी मालिका खेळल्या आहेत. यापैकी 8 देशात भारताला कसोटी मालिका जिंकण्यात आता यश आले आहे. त्यामुळे आता फक्त दक्षिण आफ्रिकेत भारताला कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.
तसेच भारताने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असणाऱ्या सेना देशांपैकी न्यूझीलंडमध्ये 1967-68 मध्ये आणि 2008-09 मध्ये कसोटी मालिकेत विजय मिळवला होता, तर इंग्लंडमध्ये 1971, 1986 आणि 2007 असे तीन वेळा कसोटी मालिकेत विजय मिळवले आहेत.
त्याचबरोबर आता ऑस्ट्रेलिया विरुद्धही कसोटी मालिका विजयाचे स्वप्न भारताचे पूर्ण झाले आहे. मात्र भारत अजूनही दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका विजयाच्या प्रतिक्षेत आहे.
भारताचा 8 देशातील पहिला कसोटी मालिका विजय –
1967 – न्यूझीलंडमध्ये (कर्णधार – मन्सूर अली खान पतौडी)
1971 – विंडीजमध्ये (कर्णधार – अजित वाडेकर)
1971 – इंग्लंडमध्ये (कर्णधार – अजित वाडेकर)
1994 – श्रीलंकेमध्ये (कर्णधार – मोहम्मद अझरुद्दीन)
2000 – बांगलादेशमध्ये (कर्णधार – सौरव गांगुली)
2004 – पाकिस्तानमध्ये (कर्णधार – सौरव गांगुली/राहुल द्रविड)
2005 – झिम्बाब्वेमध्ये (कर्णधार – सौरव गांगुली)
2019 – ऑस्ट्रेलियामध्ये (कर्णधार – विराट कोहली)
दक्षिण आफ्रिकेमध्ये – ??
महत्त्वाच्या बातम्या-
–या कारणामुळे चेतेश्वर पुजाराच आहे द्रविडचा वारसदार
–फक्त या देशांनी जिंकल्या आहेत या ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका
–कसोटी मालिकेत शानदार विजय मिळवुनही किंग कोहली आहे नाराज