---Advertisement---

धक्कादायक! इंग्लंडच्या वनडे संघातील ७ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह, एका रात्रीत बदलावा लागणार संपूर्ण संघ

On: मंगळवार, जुलै 6, 2021 2:26 PM
---Advertisement---

जगभरात गेल्या दीड वर्षापासून हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसचा फटका क्रीडाक्षेत्रालाही बसत आहे. नुकतीच धक्कादायक गोष्ट समोर येत आहे, ती म्हणजे इंग्लंडच्या वनडे संघातील ७ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. विशेष म्हणजे इंग्लंडची ८ जुलैपासून पाकिस्तान संघाविरुद्ध ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु होणार आहे.

मात्र, आता या मालिकेसाठी निवडलेल्या संघातील ७ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने संघातील सर्वच सदस्य सेल्फ आयसोलेशनध्ये गेले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या ७ सदस्यांमध्ये ३ खेळाडूंचा आणि ४ सपोर्ट स्टाफ सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांना युके सरकारच्या नियमाप्रमाणे ४ जुलैपासून आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी ब्रिस्टोल येथे इंग्लंड संघाची कोरोना तपासणी करण्यात आली होती.

असे असले तरी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मंगळवारी (६ जुलै) जाहीर केले आहे की पाकिस्ताविरुद्धची वनडे मालिका आणि त्यानंतर होणारी टी२० मालिका नियोजित वेळेनुसारच होईल. फक्त पुढील काही तासात इंग्लंडचा संपूर्ण नवीन संघ जाहीर करण्यात येईल. या नव्या संघाचे कर्णधारपद अनुभवी अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला देण्यात आले आहे.

स्टोक्सने नुकतेच बोटावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. आता त्याचे इंग्लंड संघातही पुनरागमन होईल. तो इंग्लंडकडून अखेरचे या वर्षाच्या सुरुवातीला भारत दौऱ्यात खेळला होता. त्यानंतर त्याला आयपीएल २०२१ दरम्यान बोटाला दुखापत झाल्याने शस्त्रक्रिया करुन घ्यावी लागली होती.

‘आम्हाला एका रात्रीत नवीन संघ उभा करायचा आहे’
इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे सीईओ टॉम हॅरिसन म्हणाले, ‘आम्हाला डेल्टा व्हेरिएंटचा उदय आणि जैव सुरक्षित वातावरणाच्या कठोर अंमलबजावणीपासून दूर जाण्याने आणखी उद्रेक होण्याची शक्यता वाढू शकते, या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. आम्ही आमच्या खेळाडूंच्या आणि व्यवस्थापन कर्मचार्‍यांच्या, ज्यांनी मागील १४ महिन्यांत बऱ्याच निर्बंध असलेल्या परिस्थितीचा सामना केला आहे, त्यांच्या एकूणच सुरक्षिततेसाठी नियमांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आहे.’

तसेच हॅरिसन म्हणाले, ‘आम्हाला एका रात्रीत नवीन संघ उभा करायचा आहे आणि आम्ही बेन स्टोक्सचे आभारी आहोत की त्याने इंग्लंड संघाचे कर्णधारपद स्विकारले आहे. या बातमीचा आमच्या प्रथम श्रेणी काउंटींवर आणि त्यांच्या संघावर कसा परिणाम होईल हे आम्ही देखील ओळखतो आणि आम्ही त्यांचे तसेच आमचे भागीदार स्काय आणि रॉयल लंडन यांचे सातत्याने पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानतो.’

श्रीलंकाविरुद्धच्या टी२० मालिकेदरम्यान सामनाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह
पाकिस्तानविरुद्धची मालिका सुरु होण्यापूर्वी इंग्लंड संघ श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी२० मालिका खेळला होता. २३ ते २६ जून दरम्यान पार पडलेल्या या टी२० मालिकेत सामनाधिकारी म्हणून भूमिका बजावलेले फिल व्हिटीकेस कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या ७ सदस्यांना देखील सेल्फ आयसोलेट करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात वनडे मालिका झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

धक्कादायक! इंग्लंडच्या वनडे संघातील ७ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह, एका रात्रीत बदलावा लागणार संपूर्ण संघ

‘चांगली कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षकाला हटवण्याची गरज नाही’, रवी शास्त्रींना दिग्गज कर्णधाराची साथ

फेडररचा ‘मोठा’ विक्रम! विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारा ठरला सर्वात वयस्कर टेनिसपटू 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---