ब्रिस्टोल। इंग्लंड महिला विरुद्ध भारतीय महिला यांच्यात बुधवारपासून ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना काऊंटी ग्राउंडवर खेळवण्यात आला. या सामन्यातून भारताची १७ वर्षीय सलामी फलंदाज शेफाली वर्माने वनडे पदार्पण केले आहे. त्यामुळे तिच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली आहे.
शेफालीच्या नावावर मोठा विक्रम
शेफालीने वनडे पदार्पण करण्यापूर्वी भारताचे कसोटी आणि टी२० क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे आता ती भारतीय संघाचे तिन्ही क्रिकेट प्रकारात प्रतिनिधत्व करणारी पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंपैकी सर्वात युवा क्रिकेटपटू ठरली आहे. तिने बुधवारी जेव्हा वनडे पदार्पण केले, तेव्हा तिचे वय १७ वर्षे १५० दिवस होते. १८ वर्षांपेक्षा कमी वयात ती भारताचे तिन्ही क्रिकेट प्रकारात प्रतिनिधित्व करणारी पहिली आणि एकमेव क्रिकेटपटू आहे.
यापूर्वी हा विक्रम स्म्रीती मंधनाच्या नावावर होता. तिने १८ वर्षे २६ दिवस इतके वय असताना तिन्ही क्रिकेट प्रकारात पहिल्यांदा भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच पुरुषांच्या क्रिकेटमध्ये इशांत शर्माच्या नावावर हा विक्रम आहे. जेव्हा इशांतने भारताकडून तिन्ही क्रिकेट प्रकारात पहिल्यांदा प्रतिनिधित्व केले होते, तेव्हा त्याचे वय १९ वर्षे १५२ दिवस इतके होते.
शेफालीने वयाच्या १६ व्या वर्षी भारताकडून दक्षिण आफ्रिके महिला संघाविरुद्धच्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच तिने १६ जून २०२१ रोजी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून कसोटी पदार्पण केले होते. कसोटी पदार्पणाच्या दोन्ही डावात तिने अर्धशतक ठोकण्याची कामगिरी केली होती.
वनडे पदार्पणात शेफाली अपयशी
कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने डंका वाजवलेल्या शेफालीला वनडे पदार्पणात मात्र फार काही खास करता आले नाही. ती १४ चेंडूत १५ धावा करुन कॅथरिन ब्रंटच्या गोलंदाजीवर अन्या श्रबसोलकडे झेल देत बाद झाली.
शेफालीची आंतरराष्ट्रीय कारकिर्द –
शेफालीने आत्तापर्यंत तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १ कसोटी सामना आणि २२ टी२० सामने खेळले आहेत. तिने २२ टी२० सामन्यांत ३ अर्धशतकांसह ६१७ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पुन्हा WTC मध्ये भिडणार भारत-न्यूझीलंड, ‘या’ महिन्यात खेळवली जाणार मालिका
VIDEO: झेल घेण्यासाठी चाहत्याने बाथटबमधून मारली उडी आणि पुढे घडले असे काही






