हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या शाहरुख खान आणि त्याच्या नाईट रायडर्स संघाने शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. शाहरुख खान आणि नाईट रायडर्स यांनी स्वत:च्या मालकीचं स्टेडियमच उभारलं आहे. नाईट रायडर्स ग्रुप अर्थात केआरजीने कॅलिफोर्नियातल्या पोमोनो इथल्या स्टेडियमचं अनावरण केलं.
कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेत शाहरुखच्या मालकीचा लॉस एंजेलिस नाईट रायडर्स हा संघ आहे. या मैदानात लॉस एंजेलिस संघाचे सामने खेळवण्यात येतील. अमेरिकेत क्रिकेट प्रसार आणि प्रचाराच्या दृष्टीने हे स्टेडियम महत्त्वाचं ठरणार आहे. २०२८ मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेतही या मैदानावर सामने आयोजित केले जाणार आहेत.
शाहरुख खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना या स्टेडियमची माहिती दिली. प्रदीर्घ काळापासूनचं एक स्वप्न प्रत्यक्षात साकारलं आहे. स्वत:च्या संघाचं स्टेडियम असावं अशी अनेक वर्ष इच्छा होती. हा क्षण प्रत्यक्षात साकारणं माझ्यासाठी भावनिक आहे असं शाहरुखने सांगितलं. फक्त क्रिकेट चाहत्यांसाठी नव्हे तर हे स्टेडियम मनोरंजनाचं केंद्र असेल असं शाहरुखने म्हटलं आहे. या स्टेडियमच्या उभारणीत सहकार्य केल्याबद्दल शाहरुखने आयसीसीचे अध्यक्ष जय शहा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता यांनी सांगितलं.
आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेल्या कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेत सुरुवातीपासूनच नाईट रायडर्स समूहाचा संघ आहे. या संघाला आता हक्काचं होम ग्राऊंड मिळालं आहे. या मैदानावर मेजर लीग क्रिकेट टी२० लीगचे सामने होणार आहेत. पोमोनातल्या फेअरप्लेक्स इथे हे मैदान आहे.
आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स, ILT20 स्पर्धेत अबू धाबी नाईट रायडर्स, मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत लॉस एंजेलिस नाईट रायडर्स यांच्यासह कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेत त्रिनबागो नाईट रायडर्स या संघांची मालकी नाईट रायडर्स संघाकडे आहे. १० एकरवर पसरलेल्या या स्टेडियमच्या उभारणीसाठी २१ मिलिअन डॉलर्स इतका खर्च करण्यात आला आहे. फक्त क्रिकेट सामन्यांच्या आयोजनासाठी म्हणून तयार करण्यात आलेलं टेक्सासमधल्या ग्रँड प्राअरी नंतरचं हे पहिलंच स्टेडियम आहे.






