एखादा माणूस आपल्या कर्तव्यात कसूर करत नसेल तर तो, आपल्या तत्वांशी किती एकनिष्ठ आहे हे दिसून येते. आपले काम चोख बजावताना, समोर कोणीही आली तरी तो त्याला जुमानत नाही. अनेकदा त्याला त्याची किंमत मोजावी लागते, पण ती किंमत ही तो कर्तव्यामुळे आनंदात चुकवतो.
अशीच एक घटना, क्रिकेटच्या मैदानावर घडली जेव्हा एका साध्या सुरक्षारक्षकाने, एका संघमालकाला नियम तोडू न देता बेधडक हटकले होते. होय, एका सुरक्षारक्षकाने संघमालकाला मैदानावर हटकले होते. मैदान होते मुंबईचे प्रसिद्ध वानखेडे स्टेडियम व तो संघमालक होता, कोलकाता नाईट रायडर्सचा संघमालक, जगप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान.
तर झालं असं की, आयपीएलच्या पाचव्या हंगामातील ६५ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्या दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. केकेआरने पहिल्यांदा फलंदाजी करताना, मनोज तिवारीच्या ४१ धावांच्या जोरावर १४० धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरादाखल, सुनील नरेनच्या फिरकीच्या तालावर मुंबईचे दिग्गज फलंदाज नाचू लागले. नरीनने चार बळी मिळवत मुंबईचा डाव १०८ धावांवर संपविला. केकेआरने ३२ धावांनी दणदणीत विजय साजरा केला.
सामना संपल्यानंतर, प्रेक्षागृहात उपस्थित असलेला केकेआरचा संघमालक अभिनेता शाहरुख खान हा आपली मुले व काही मित्रांसमवेत मैदानात आला. त्याच दरम्यान मैदानातील सुरक्षारक्षकांनी त्या मुलांना हटकले व बाहेर जाण्यास सांगितले. इतक्यात तिथे शाहरुख खान आला व थोडीशी बाचाबाची झाली. तिथे उपस्थित असणाऱ्यांना वाटले, हे प्रकरण तिथेच मिटेल पण असे झाले नाही.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात शाहरुख खानविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यांनी तक्रारीत म्हटले होते की, शाहरुख खानने मैदानावर दारूच्या नशेत सुरक्षारक्षक व काही पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ केली आहे.
प्रकरणाचे गांभीर्य समजून घेत, एमसीएचे तत्कालीन अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी व्यवस्थापकीय मंडळाची बैठक घेऊन, शाहरुख खानला पाच वर्ष वानखेडे स्टेडियमवर येण्यास बंदी घातली. शाहरुख खान, फिर्यादी सुरक्षारक्षक विकास दळवी आणि एमसीए सदस्य नितीन दलाल यांचे जबाब नोंदवण्यात आले.
शाहरुख खानने आपला जबाब नोंदविताना म्हटले,
“सामना संपल्यानंतर मी, माझी मुले सुहाना व आर्यन तसेच काही मित्रांसमवेत मैदानात गेलो. तेव्हा मुले ड्रेसिंग रूमपाशी उभी होती. इतक्यात, तो सुरक्षारक्षक मुलांशी दमदाटीच्या भाषेत बोलत, निघून जाण्यास सांगत होता. मी त्याला, ही मुले माझ्यासोबत आहेत असे सांगितले. त्यावेळी, एका इसमाने माझ्याशी अर्वाच्च भाषेत बोलल्याने मी संतापलो. काही वेळातच, आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर रमण, मुंबईचे सह पोलीसआयुक्त इक्बाल शेख त्या ठिकाणी आले व दोन्ही बाजूंना शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. काही वेळातच मी तिथून निघून गेलो. मात्र त्यावेळी मी मी दारू पिली नव्हती.”
मुख्य फिर्यादी सुरक्षारक्षक विकास दळवी आपली बाजू मांडताना म्हणाले,
“सामना संपल्यानंतर, काही मुले शिट्ट्या वाजवत व आरडाओरडा करत ड्रेसिंग रूमकडे घुसण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. इतक्यात ,त्याठिकाणी शाहरुख खान व त्याचे काही मित्र माझ्या अंगावर धावून आले व मला शिवीगाळ करू लागले. एसीपी इक्बाल शेखमध्ये पडले नसते तर त्यांनी मला मारहाण केली असती. शाहरुख खान त्याठिकाणी येण्याअगोदर मी मुलांना सभ्य भाषेत तेथून जाण्यास सांगत होतो.”
नितीन दलाल यांनी एमसीएच्या बाजूने म्हटले,
“दळवी यांच्या फिर्यादीनंतर आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली. आमच्या सुरक्षारक्षकाने मुलांशी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केले नाही व शाहरुख खानने सामन्याआधीही आणि सामन्यानंतरही दारू पिली नव्हती.”
सखोल चौकशीनंतरही शाहरुख खानवरील बंदी कायम ठेवण्यात आली.
२०१५ मध्ये एमसीएचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांनी ही बंदी रद्द उठवली. एमसीएचे उपाध्यक्ष आशिष शेलार यांनी एक निवेदन सार्वजनिक करत म्हटले,
“एमसीएच्या बैठकीत आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स या संघाचे मालक शाहरुख खान यांच्यावरील लादलेली बंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमसीए अध्यक्ष शरद पवार यांनी ठेवलेला बंदी हटविण्याविषयीचा प्रस्ताव व्यवस्थापकीय समितीने एकमताने मंजूर केला आहे. त्यामुळे वानखेडे स्टेडियममध्ये शाहरुख खान हे प्रवेश करू शकतात.”
बंदी मागे घेतल्यानंतरही शाहरुख खान आजतागायत वानखेडे स्टेडियममध्ये परत दिसला नाही.
वाचा- झिम्बाब्वेला क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ऍलिस्टर कॅम्पबेलची कारकिर्द एक अध्याय ठरली