भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचे माजी खेळाडू चांगलेच चिडलेले आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने तर त्याच्या जावयाला नाही सोडले. बाबर, शाहीन आणि शादाबला बाकी सामन्यांसाठी बाकावर बसवा, असे मत शाहिदने व्यक्त केले आहे. पुन्हा-पुन्हा तोच निकाल लागत असल्याने आता नव्या खेळाडूंना संधी देण्याची वेळ आली आहे, असेही विधान त्याने केले आहे.
आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारताने रविवारी (१५ फेब्रुवारी) पाकिस्तानला ६१ धावांनी पराभूत केले. यामुळे संघातील अनुभवी खेळाडू बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी आणि शादाब खान यांच्यावर आजी-माजी पाकिस्तानी खेळाडूंनी चांगलाच शब्दांचा मारा केला आहे.
शाहिद एका न्यूज चॅनलच्या कार्यक्रमात बोलत होता. तो म्हणाला, “जर निर्णय घेणे माझ्या हातात असते, तर मी पुन्हा टी20 संघात बाबर, शादाब आणि शाहीन यांना निवडले नसते. त्यांना पाकिस्तानसाठी चांगली कामगिरी करण्याच्या अनेक संधी मिळाल्या आहेत, पण काल ते पुन्हा अपयशी ठरले. तेच-तेच खेळाडू खेळत असून तोच निकाल मिळत आहे. यामुळे आता नवख्या खेळाडूंना संधी देणे आवश्यक आहे.”
भारताविरुद्ध बाबरची कामगिरी काही खास नाही. कालच्या सामन्यातही तो ७ चेंडूत ५ धावा करत बाद झाला. भारताविरुद्ध पाकिस्तानच्या सात खेळाडूंनी गोलंदाजी केली. त्यामध्ये शाहीनची कामगिरी सर्वात निराशाजनक राहिली. त्याने २ षटकात ३१ धावा देत केवळ एक विकेट घेतली. त्याने फलंदाजीत मात्र उत्तम कामगिरी केली. त्याने १९ चेंंडूत नाबाद २३ धावा काढल्या.
शादाबनेही एका षटक टाकले असता १७ धावा दिल्या. त्याने फलंदाजीतही निराशा केली. तो १५ चेंडूत १४ धावा करत बाद झाला.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले होते. सलामीवीर ईशान किशनच्या ७७ धावांच्या जोरावर भारताने २० षटकात ७ विकेट्स गमावत १७५ धावसंख्या उभारली होती. एवढे मोठे लक्ष्य असताना पाकिस्तानी फलंदाज अधिक काळ खेळपट्टीवर टिकलेच नाही. संपूर्ण संघ १८ षटकात ११४ धावा करत बाद झाला.
मागील टी२० विश्वचषक किंवा आयसीसी स्पर्धांमधील पाकिस्तानची कामगिरी भारताविरुद्ध निराशाजनकच राहिली आहे. २०२५मध्ये तर भारताने पाकिस्तानला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि एशिया कपच्या सामन्यांमध्ये पराभूत केले. पुन्हा आता तशीच कामगिरी होत असल्याने पाकिस्तानी माजी खेळाडू चांगलेच चिडलेले दिसत आहेत.






