क्रिकेट आणि बॉलिवूड.. संपूर्ण भारत देशातील मनोरंजनाचे दोन प्रमुख स्त्रोत.. या दोन्ही क्षेत्रांचे एकमेकांशी घनिष्ट संबंध देखील आहेत. क्रिकेट आणि बॉलिवुड क्षेत्रांना ज्या व्यक्तीने सर्वाधिक आपलेसे केले आहे तो व्यक्ती म्हणजे बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान. एक दर्दी क्रिकेटप्रेमी असलेला शाहरुख अगदी सुरुवातीच्या काळापासून क्रिकेटची जोडला गेला आहे. शालेय स्तरावर क्रिकेट खेळलेल्या शाहरुखने, आज क्रिकेटमध्ये दोन संघांची मालकी घेतली आहे. कोलकाता नाईट रायडर्स या नावाने आयपीएलमध्ये तर त्रिबॅगो नाईट रायडर्स या नावाने सीपीएलमध्ये हे संघ खेळत असतात. फक्त आपल्या मालकीच्या संघांसाठी नव्हे तर ज्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघ महत्वाचे सामने खेळत असतो, त्यावेळीही शाहरुख मैदानात उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल वाढवताना दिसला आहे. भारत देशामध्ये शाहरुख खान हा एक ‘ब्रँड’ असल्याने, तो अनेक जाहिरातींमध्ये आपल्याला दिसतो. शाहरुखने, आत्तापर्यंत केलेल्या असंख्य जाहिरातींमध्ये, काही अशा जाहिराती देखील केल्या आहेत; ज्यामध्ये क्रिकेटचा संदर्भ आला आहे. आज शाहरुखच्या जन्मदिनी, त्याने केलेल्या क्रिकेट संबंधित जाहिरातींविषयी आपण जाणून घेऊया.
१) जेव्हा शाहरुख ‘सचिन’ होतो
इंग्लंडमध्ये झालेल्या १९९९ विश्वचषकावेळी, एका शीतपेयाच्या जाहिरातीसाठी शाहरुखने सचिनचे रुप घेतले होते. शीतपेये मिळवण्यासाठी शाहरुख सचिनचे रूप घेऊन, भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूम मध्ये घुसतो. ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर तो सदागोपन रमेश, राहुल द्रविड, व्यंकटेश प्रसाद यांना चेहरा लपवून भेटतो. शेवटी शीतपेय पित असताना, भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन त्याला सचिन समजून फलंदाजीसाठी पाठवतो. शाहरुख मैदानात उतरत असताना, खरा सचिन त्याला भेटतो आणि तो देखील त्याची मजा घेतो. अशी काहीशी ही जाहिरात होती.
२) “एक कप और..यह दिल मांगे मोर”
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या २००३ विश्वचषकावेळी पुन्हा एकदा शाहरुख त्या शीतपेय कंपनीसाठी जाहिरात करताना दिसला. भारतातील सर्वसामान्य जनता, भारताने विश्वचषक जिंकावा अशी अपेक्षा बाळगून असते. या जाहिरातीसाठी “एक कप और..यह दिल मांगे मोर” असे ब्रीदवाक्य वापरले होते. शाहरुखसोबत या जाहिरातीमध्ये फरदीन खान व करीना कपूर यांनीदेखील सहभाग घेतला होता.
३) धोनी शाहरुख भाई-भाई
भारतीय संघाने २००७ टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर, भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनी व शाहरुख यांनी एकत्रितपणे एक जाहिरात केली. लहानपणी जत्रेत ठरवलेले भाऊ पुढे जाऊन भारतीय संघाचा कर्णधार व यशस्वी बॉलीवूड अभिनेता होतात, अशी या जाहिरातीची कहाणी होती. एका टीव्ही कंपनीसाठीच्या जाहिरातीत धोनीने अभिनेत्याचा तर शाहरुखने क्रिकेटपटूचा अभिनय केला होता.
४) केकेआरला स्लेजिंग शिकवण्यासाठी केली जाहिरात
आयपीएलच्या पहिल्या दोन हंगामात केकेआरची कामगिरी खराब राहिल्यानंतर, शाहरुखने एक जाहिरात केली होती. आपल्या संघाला स्लेजिंग शिकवण्यासाठी एका मोबाईल कंपनीच्या जाहिरातीसाठी त्याने ही जाहिरात केली. टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया, खेळाडूंनी स्लेजिंग कशी करावी याविषयी मार्गदर्शन करताना दिसते. आपल्या संघाला स्लेजिंगच्या टिप्स द्या, असे आवाहन शाहरुखने केले होते.
५) क्लॅश ऑफ किंग्ज
भारतात आयोजित २०१० चॅंपियन्स लीग स्पर्धेच्या प्रसिद्धीसाठी शाहरुखने एक जाहिरात केली होती. आयपीएलमधील आघाडीचे संघ व इतर देशातील अव्वल टी२० संघ या स्पर्धेत सहभागी होत. बुद्धिबळाच्या पटावरील राजाची संकल्पना या जाहिरातीत दाखवली गेली होती.
६) उशीर करू नका, चॅम्पियन्स खेळणार आहेत
ज्याप्रकारे, २०१० चॅम्पियन्स लीगसाठी शाहरुखने जाहिरात केली, त्याचप्रकारे पुढच्या वर्षी देखील त्याने चॅम्पियन लीगसाठी पुन्हा एकदा प्रसिद्धी जाहिरात केली. “चॅम्पियन्स प्लेड ऍट ८, डोन्ट बी लेट” असे या जाहिरातीचे ब्रीदवाक्य होते. या स्पर्धेतील सामन्यांचा वेळ सायंकाळी आठचा असल्याने, तो लोकांना ही वेळ न विसरण्याविषयी प्रेक्षकांना सांगत होता.
७) युवा क्रिकेटपटूंचा वाढवला उत्साह
सन २०१३ मध्ये एका महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या प्रसिद्धीसाठी शाहरुखने जाहिरात केली होती. क्रिकेटजगतातील वास्तव सांगताना, आपण हिंमत हरायला नको आणि संयम ठेवायला हवा; आपली वेळ नक्की येते, असा संदेश या जाहिरातीतून दिला गेला होता.
८) केबल कंपनीसाठी जाहिरात
शाहरुख एका केबल कंपनीचा ब्रँड ॲम्बेसिडर असताना, त्याने क्रिकेट संबंधित एक जाहिरात केली होती. कंपनीचे नवीन दर व नवीन सोयीसुविधा या जाहिरातीद्वारे सांगितल्या गेल्या होत्या.
वाचनीय लेख- क्रिकेट विश्वचषकाच्या गाजलेल्या जाहिराती, ज्या तुम्हाला आठवण करुन देतात तुमचं बालपण






