भारतीय क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीचा नवीन हंगाम सध्या भारतातील विविध शहरांमध्ये खेळला जात आहे. १७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या स्पर्धेत अनेक युवा खेळाडू आपला दम दाखवताना दिसत आहेत. आयपीएलमध्ये निवडल्या गेलेल्या अब्दुल समद, यश धूल व सर्फराज खान या नवोदित खेळाडूंनी चमकदार खेळ करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचबरोबर आयपीएलमधून नावारूपाला आलेल्या तमिळनाडूच्या शाहरुख खान याने दिल्लीविरुद्ध तूफानी शतक झळकावून सर्वांची वाहवा मिळवली.
रणजी हंगामाच्या पहिल्या दिवशी दिल्लीसाठी यश धूलने पदार्पण करत शानदार शतक झळकावत कौतुक मिळवले. दिल्लीने यश व अष्टपैलू ललित यादव यांच्या शतकाच्या जोरावर ४५२ धावा बनविल्या. प्रत्युत्तरात, तमिळनाडूने अवघ्या १६२ धावांवर ५ बळी गमावले होते.
संघ अडचणीत असताना आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शाहरुख खानचे खेळपट्टीवर आगमन झाले. त्याने आधी बाबा इंद्रजितसह शतकी भागीदारी केली. इंद्रजित ११७ धावांवर बाद झाल्यानंतर शाहरुखने डावाची सुत्रे हातात घेतली. त्याने अवघ्या ८९ चेंडूवर शतक झळकावले. हे त्याचे कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट प्रकारातील पहिले शतक आहे. शाहरुखने ही खेळी आणखी पुढे नेली. त्याने १४८ चेंडूवर २० चौकार व १० षटकारांच्या मदतीने १९४ धावा चोपल्या. द्विशतकाच्या जवळ असलेल्या शाहरुखला नितीश राणाने बाद केले.
पंजाबने लावली मोठी बोली
आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये शाहरुख खानची मूळ किंमत ४० लाख रुपये होती. प्रीती झिंटाचा संघ पंजाब किंग्सने ९ कोटींची बोली लावून शाहरुखला आपल्या संघात समाविष्ट केले. त्याच्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज (CSK), कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात लढत झाली. शाहरुख हा मागील हंगामातही पंजाब संघाचाच भाग होता. मात्र, संघाने त्याला रिटेन केले नव्हते.
महत्वाच्या बातम्या-