बांगलादेशचा अनुभवी क्रिकेटपटू शाकिब अल हसननं इतिहास रचला आहे. भारताविरुद्धच्या चेन्नई कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मैदानावर उतरताच त्यानं एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला.
वास्तविक, शाकिब बांगलादेशसाठी कसोटी क्रिकेट खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला. त्याच्यापूर्वी हा रेकॉर्ड मोहम्मद रफीकच्या नावे होता. चेन्नई कसोटीच्या तिसऱ्या दिवशी जेव्हा शाकिबनं मैदानावर पाऊल ठेवलं, तेव्हा त्याचं वय 37 वर्ष 181 दिवस होतं. यासह त्यानं बांगलादेशचा माजी फिरकीपटू मोहम्मद रफीकचा रेकॉर्ड मोडला. शाकिबनं 17 वर्षांपूर्वी 2007 मध्ये भारताविरुद्ध आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. तेव्हापासून तो सातत्यानं बांगलादेशसाठी क्रिकेट खेळतोय.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून खेळण्याचा खास रेकॉर्ड इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू विल्फ्रेड रोड्स यांच्या नावे आहे. त्यांनी आपला शेवटचा कसोटी सामना 52 वर्ष 165 दिवस वयात खेळला होता. ते 1930 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचे मैदानात उतरले होते. याशिवाय रोड्स यांच्या नावे सर्वाधिक काळ क्रिकेट खेळण्याचा रेकॉर्ड देखील आहे. ते जवळपास 30 वर्ष व्यावसायिक क्रिकेट खेळले. त्यांनी इंग्लंडसाठी एकूण 58 कसोटी सामने खेळले आहेत.
शाकिबनं आतापर्यंत बांगलादेशसाठी 69 कसोटी सामने खेळले. या फॉरमॅटच्या 126 डावात त्यानं 4543 धावा केल्या आहेत. त्याच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये 5 शतकं आणि 31 अर्धशतकं आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 38.5 एवढी राहिली. याशिवाय शाकिबनं गोलंदाजीतही आपली जादू दाखवली. त्यानं बांगलादेशसाठी कसोटीमध्ये 242 विकेट घेतल्या आहेत. तो सध्या कसोटीमधील अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा –
पंत पाठोपाठ शुबमन गिलचंही शतक, टीकाकारांची बोलती बंद
रिषभ पंतचे शानदार शतक, कमबॅकच्या सामन्यात मोडला गुरु धोनीचा हा महान रेकाॅर्ड!
रिषभ पंतनं सेट केली चक्क बांगलादेशची फिल्डिंग! व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही