आयसीसी २०२१ विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. रविवारी (१७ ऑक्टोबर) या स्पर्धेतील पात्रता फेरीतील पहिले २ सामने पार पडले. ज्यामध्ये दुसऱ्या सामन्यात बांगलादेश आणि स्कॉटलॅंड हे दोन्ही संघ आमने सामने होते. या अटीतटीच्या सामन्यात बांगलादेश संघाला ६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान बांगलादेश संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
या सामन्यात बांगलादेश संघाचा कर्णधार महमुदुल्लाहने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या स्कॉटलॅंड संघाला साजेशी सुरुवात करण्यात अपयश आले होते. स्कॉटलॅंड संघाचा कर्णधार काईल कोएटजर लवकर बाद होऊन माघारी परतला होता. त्यानंतर एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होऊन माघारी परतत होते.
दरम्यान ११ व्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर शाकिब अल हसनने रीची बेरींग्टनला बाद केले. त्यानंतर याच षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने माईकल लेस्कला देखील बाद करत माघारी धाडले. यासह तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे.
शाकिब अल हसनने आपल्या टी -२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण १०८ गडी बाद केले आहेत. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगाच्या नावे होता. शाकिब अल हसनने आतापर्यंत ८९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला १०८ गडी बाद करण्यात यश आले आहे. तर लसिथ मलिंगाने ८४ सामन्यात १०७ गडी बाद केले होते. तसेच न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज टीम साउथीने ८३ सामन्यात ९९ गडी बाद केले आहेत, यासह तो सर्वाधिक विकेट्सच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
On 🔝 of the charts 📈
Well done, Shakib Al Hasan 👏#BANvSCO #T20WorldCup #Bangladesh pic.twitter.com/yVuAVaiWtg
— ICC (@ICC) October 18, 2021
दरम्यान या सामन्यात स्कॉटलॅंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना ख्रिस ग्रीव्ह्सने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. तर जॉर्ज मुन्सीने २९ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर स्कॉटलॅंड संघाला २० षटक अखेर ९ बाद १४० धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेश संघाकडून मुष्फिकुर रहीमने सर्वाधिक ३८ धावांची खेळी केली. तर महमुदुल्लाहने २३ धावांचे योगदान दिले. परंतु बांगलादेश संघाला हे आव्हान पूर्ण करता आले नाही. त्यामुळे त्यांना ६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात ओमानचा मोठा विजय; पीएनजीला १० विकेट्सने केलं पराभूत
‘क्रिकेटच्या मोठ्या सामन्यासाठी सज्ज’, भारतीय दिग्गजांबरोबर मस्ती करताना अख्तरने केले फोटो शेअर
टी २० विश्वचषकाच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक निकालाची नोंद, बांगलादेश स्कॉटलंडकडून पराभूत