आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन शानदार प्रदर्शन करताना दिसतो आहे. त्याने पात्रता फेरी सामन्यांमध्ये आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर संघाला सामने जिंकून दिले आहेत. तसेच सुपर-१२ फेरीमध्येही पोहोचवले आहे. गुरुवारी (२१ ऑक्टोबर) अल अमिरात येथे पापुआ न्यू गिनीविरुद्ध झालेल्या ‘करा वा मरा’च्या लढतीतही त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे बांगलादेशने ८४ धावांनी बाजी मारली आहे. याच सामन्यादरम्यान त्याने मोठा किर्तीमानही आपल्या नावावर केला आहे.
शाकिबने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ३७ चेंडूंमध्ये ४६ धावांची खेळी केली होती. त्यानंतर गोलंदाजीमध्ये त्याने सर्वाधिक ४ विकेट्स काढल्या आहेत. ४ षटकांमध्ये अवघ्या ९ धावा देत त्याने ही कामगिरी केली आहे. त्याच्या याच प्रदर्शनामुळे त्याला या सामन्यात सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
पापुआ न्यू गिनीच्या तब्बल ४ फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवत शाकिबने टी२० विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. याबाबतीत त्याने पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदीच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. शाकिब २८ टी२० सामन्यामध्ये ३९ विकेट्स घेत संयुक्तपणे अव्वलस्थानी पोहोचला आहे. आफ्रिदीने ३४ टी२० सामन्यांमध्ये हा पराक्रम केला होता.
शाकिब आणि आफ्रिदीनंतर श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा ३१ टी२० सामन्यांमधील ३८ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानचा माजी गोलंदाज सईद अजमल ३६ विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे.
सक्रिय क्रिकेटपटूंविषयी बोलायचे झाल्यास, शाकिबव्यतिरिक्त कोणताही गोलंदाज टी२० विश्वचषकात ३० पेक्षा जास्त विकेट्स घेऊ शकलेला नाही. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्रावो २५ विकेट्ससह शाकिबनंतर दुसऱ्या स्थानी आहे. तर एकूण यादीत त्याचा नववा क्रमांक लागतो.
इतकेच नव्हे तर, शाकिब सध्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या विक्रमातही अव्वल आहे. त्याने टी२० विश्वचषकातील स्कॉटलँडविरुद्धच्या पात्रता फेरी सामन्यात हा विक्रम आपल्या नावावार केला होता. सध्या त्याच्या खात्यात ९१ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक ११५ विकेट्सची नोंद आहे. त्याच्याखेरीज फक्त लसिथ मलिंगा (१०७ विकेट्स) हाच फक्त आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १०० किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेऊ शकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पीएनजीविरुद्ध ३ धावांनी शाकिबचे अर्धशतक हुकले, पण टी२० विश्वचषकातील ‘या’ विक्रमांत रोहितला पछाडले
टी२० विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडला ‘४४० व्होल्टचा झटका’, सर्वात महत्त्वाचा खेळाडू दुखापतग्रस्त
विराटची गोलंदाजी अन् स्मिथची बॅटिंग! ११ वर्षांनी सराव सामन्यादरम्यान घडला खास योगायोग






