टाँटन| सोमवारी (17 जून) आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात 23 वा सामना विंडीज विरुद्ध बांगलादेश संघात पार पडला. या सामन्यात बांगलादेशने 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. बांगलादेशच्या या विजयात अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसनने अष्टपैलू कामगिरी करत मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच त्याने एका विश्वविक्रमालाही गवसणी घातली आहे.
शाकिबने या सामन्यात 99 चेंडूत नाबाद 124 धावांची शतकी खेळी केली. या खेळीत त्याने 16 चौकार मारले. त्याचबरोबर त्याने गोलंदाजी करताना 2 विकेट्सही घेतल्या. त्याचबरोबर शाकिबने या सामन्यात 6000 वनडे धावांचा टप्पाही पार केला आहे.
त्यामुळे तो 6000 वनडे धावा आणि 250 पेक्षा अधिक वनडे विकेट्स घेणारा जगातील चौथा अष्टपैलू क्रिकेटपटू ठरला आहे. तसेच त्याने 202 सामन्यात हा पराक्रम केला आहे. त्यामुळे तो सर्वात जलद 6000 वनडे धावा आणि 250 पेक्षा अधिक वनडे विकेट्स घेणारा अष्टपैलू क्रिकेटपटूही ठरला आहे.
या आधी हा विक्रम शाहिद अफ्रिदीच्या नावावर होता. अफ्रिदीने 6000 वनडे धावा आणि 250 पेक्षा अधिक विकेट्सचा टप्पा गाठण्यास 294 सामने लागले होते.
शाकिबचे आता 202 वनडे सामन्यात 6101 धावा झाल्या आहेत. यात त्याच्या 9 शतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने 254 विकेट्स घेतल्या आहेत.
सोमवारी झालेल्या विंडीज विरुद्ध बांगलादेश सामन्यात विंडीजने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 321 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून शाय होप(96), एव्हिन लुईस(70) आणि शिमरॉन हेटमायरने(50) अर्धशतकी खेळी केली.
तसेच बांगलादेशकडून गोलंदाजीत मोहम्मद सैफुद्दीन आणि मुस्तफिजूर रेहमान यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच शाकिबने 2 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 322 धावांचे आव्हान शाकिबने केलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने 41.3 षटकात सहज पार केले. बांगलादेशकडून शाकिबला लिटॉन दासने नाबाद 94 धावा करुन चांगली साथ दिली. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी नाबाद 189 धावांची भागीदारी रचली. विंडीजकडून गोलंदाजीत आंद्रे रसल आणि ओशान थॉमसने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
वनडेमध्ये सर्वाद जलद 6000 धावा आणि 250पेक्षा अधिक विकेट्स घेणारे क्रिकेटपटू –
202 सामने – शाकिब अल हसन
294 सामने – शाहिद अफ्रिदी
296 सामने – जॅक कॅलिस
304 सामने – सनथ जयसुर्या
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–तो खेळाडू सर्फराज अहमदला म्हणाला ‘ब्रेनलेस कॅप्टन’
–टीम इंडियासमोर पाकिस्तानच्या खेळाडूंचा होतो उंदीर, पाकिस्तानी महिलेने व्यक्त केला राग
–अखेर किंग कोहलीच आला पाकिस्तानच्या कर्णधाराच्या मदतीला