बांगलादेश आणि वेस्टइंडीज दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या कसोटी सामन्यात वेस्टइंडीजने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने या सामन्यात पाचव्या दिवशी 395 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. बांगलादेश संघ या पराभवाच्या धक्क्यातून सावरत असतानाच त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशचा अनुभवी खेळाडू शाकिब अल हसन दुखापतीमुळे आगामी कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे.
पहिल्या कसोटीतच झाली दुखापत
पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान शाकिबच्या डाव्या मांडीला दुखापत झाली होती. यानंतर तो गोलंदाजीसाठी देखील आला नव्हता. त्याच्या दुखापतीवर सतत नजर ठेवली जात होती व आता स्पष्ट करण्यात आले की तो आगामी कसोटीतून बाहेर झाला आहे. शाकिबच्या दुखापतीचा पूर्ण विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान हे लक्षात घेणे गरजेचे आहे की शाकिबने जवळजवळ चौदा महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पुनरागमन केले होते. 29 सप्टेंबर 2019 रोजी भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात शाकिबवर आयसीसीने एका वर्षाची बंदी लावली होती. शाकिबने मागील काही महिन्यांपूर्वी बांगलादेश मधील स्थानिक क्रिकेटद्वारे पुनरागमन केले होते. त्यानंतर शाकिबला आंतररष्ट्रीय संघात निवडण्यात आले.
पहिल्या कसोटी सामन्यात जाणवली शाकिबची उणीव
मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात देखील बांगलादेशला शाकिबची कमी जाणवली होती. शाकिबने वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी केली नाही व त्याचे नुकसान बांगलादेशला झाले. सामन्यावर सुरुवातीचे चार दिवस बांगलादेशचे वर्चस्व होते. बांगलादेशने पहिल्या डावात 430 धावा केल्यानंतर वेस्ट इंडिजचा पहिला डाव केवळ 259 धावांवर रोखला. यानंतर बांगलादेशने आपला दुसरा डाव 8 बाद 223 धावांवर घोषित करत वेस्ट इंडिजला 395 धावांचे लक्ष दिले होते.
शेवटच्या दिवशी 395 धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना वेस्टइंडीजची सुरुवात फारच खराब झाली. त्यांनी आपले 3 गडी केवळ 59 धावांवर गमावले. यानंतर मात्र निकृमाह बॉनर व कायले मेयर्स या दोन पदार्पण करणाऱ्या खेळाडूंनी 216 धावांची शानदार भागीदारी केली. मेयर्सने 310 चेंडूत 20 चौकार व 7 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 210 धावांची नाबाद खेळी केली. विशेष म्हणजे वेस्टइंडीजने आपल्या या पाठलागात अनेक विक्रम प्रस्थापित केले. हा आशियामधील सर्वात मोठा तर विश्व क्रिकेट मधील चौथा सर्वात मोठा धावांचा पाठलाग ठरला.
महत्वाच्या बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : सहा गोलांच्या थरारात मुंबई सिटी-गोवा बरोबरी
म्हणून ट्विटरकरांना आली वीरेंद्र सेहवागची आठवण!
शाबास लंबू! ३०० विकेट्सचा पल्ला गाठणाऱ्या इशांत शर्माचे माजी खेळाडूंनी केले खास अंदाजात कौतुक