बांगलादेशच्या संघानं पाकिस्तानविरुद्ध शानदार कामगिरी करत पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली. बांगलादेशनं दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तान संघाचा 2-0 असा पराभव केला. विशेष म्हणजे, बांगलादेशनं पाकिस्तानविरुद्ध प्रथमच कसोटी सामना जिंकला आहे.
आता या महिन्याच्या अखेरीस बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि बांगलादेशात कसोटी आणि टी20 मालिका खेळली जाईल. बांगलादेशचा संघ पुढील आठवड्यात भारतासाठी रवाना होणार आहे. मात्र, संघाचा दिग्गज खेळाडू शाकिब अल हसन संघासह पाकिस्तानातून मायदेशी परतणार नाही.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष फारुख अहमद यांनी पुष्टी केली की, अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर आपल्या सहकाऱ्यांसोबत ढाका येथे परतणार नाही. शाकिब इंग्लंडला जाणार आहे, जिथे तो ‘सरे’कडून काऊंटी क्रिकेट खेळताना दिसेल.
फारुख यांनी खुलासा केला की, ते बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष बनण्यापूर्वीच शाकिबनं ‘सरे’कडून खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळवलं होते. “मी बीसीबी अध्यक्ष म्हणून रुजू होण्यापूर्वीच शाकिबनं ‘सरे’कडून खेळण्यासाठी एनओसी मिळवली होती,” असं ते म्हणाले.
येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनवर देशात नुकतेच झालेले निदर्शनं आणि हिंसाचाराच्या घटनांदरम्यान कथित हत्येच्या प्रकरणात आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हिंसाचारात शेकडो लोक मारले गेले आहेत. पंतप्रधान शेख हसीना यांनी देशआतून पलायन केल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डातही महत्त्वाचे बदल झाले. नजमुल हसन पापोन यांच्या राजीनाम्यानंतर माजी राष्ट्रीय कर्णधार फारुख अहमद हे नवे अध्यक्ष बनले आहेत.
हेही वाचा –
उंची 6 फूट 7 इंच, अवघ्या 20 वर्षाचा गोलंदाज करणार इंग्लंडसाठी कसोटी पदार्पण!
WTC फायनलच्या फॉरमॅटमध्ये बदल करण्याची मागणी, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची आयसीसीला महत्त्वपूर्ण सूचना
आयसीसी क्रमवारीत जो रुटचा दबदबा, बाबर आझम टॉप-10 मधून बाहेर; विराट-रोहितचं स्थान कितवं?