आशिया चषक 2022 मधील पाचवा सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्या दरम्यान दुबई येथे खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार व अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसन याने टी20 क्रिकेटचा इतिहासातील एक मैलाचा दगड पार केला.
दुबई येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेश संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. सलामीवीर शब्बीर रहमान डावाच्या तिसऱ्या षटकात बाद झाल्यानंतर शाकिब अल हसन मैदानात उतरला. आपल्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील 101 वा सामना खेळत असलेल्या शाकिबने 22 चेंडूवर 3 चौकारांच्या मदतीने 24 धावा केल्या. त्याला महिश तिक्षणा याने त्रिफळाचित केले. मात्र या छोट्याशा खेळीत शाकिबने टी20 क्रिकेटमध्ये 6000 धावांचा टप्पा पार केला. टी20 क्रिकेटमध्ये 6000 धावा व 400 बळी मिळवणारा तो केवळ दुसरा क्रिकेटपटू ठरला.
टी20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू वेस्ट इंडीजचा दिग्गज अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो हा आहे. त्याने आतापर्यंतच्या आपल्या कारकीर्दीत 549 टी20 सामने खेळताना 6871 धावा व 605 बळी मिळवले आहेत. ब्राव्होने वेस्ट इंडीजच्या राष्ट्रीय संघाव्यतिरिक्त आयपीएल, सीपीएल, पीएसएल, हंड्रेड इत्यादी लीग खेळल्या आहेत.
शाकिबचा विचार केला तर त्यांनी आतापर्यंत 369 टी20 सामन्यात 6019 धावा व 419 बळी मिळवले आहेत. शाकिब बांगलादेशसह आयपीएल, सीपीएल, बीपीएल इत्यादी टी20 लीग खेळताना दिसतो.
महत्वाच्या बातम्या-
‘विराट-सूर्यापेक्षा बाबर चांगला…’ म्हणणाऱ्या पत्रकाराला टीम इंडियाच्या चाहत्यांनी केले ट्रोल
टीम इंडियाची खिलाडूवृत्ती! हॉंगकॉंगच्या संघाला केले ड्रेसिंग रूममध्ये आमंत्रित; पाहा खास छायाचित्रे
केएल राहुलला अजून संधी दिल्याच पाहिजे! भारताच्या माजी कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया