आयपीएलच्या 13 व्या हंगामातील चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला 16 धावांनी पराभूत केले होते. या सामन्यात राजस्थानचा युवा फलंदाज संजू सॅमसनने उत्कृष्ठ फलंदाजी केली होती. त्याने 32 चेंडूत तब्बल 74 धावा ठोकल्या होत्या.
शेन वॉर्नने केले कौतुक
या खेळीनंतर त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न यानेही त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. तो म्हणाला, “संजू सॅमसन एक प्रतिभावान खेळाडू आहे हे मी बर्याच दिवसांपासून सांगत आहे. तो भारतीय संघाकडून तीनही स्वरूपात खेळत नाही याचे मला आश्चर्य वाटते.”
भारताकडून तीनही स्वरूपात दिसेल खेळताना
पुढे बोलताना वॉर्न म्हणाला, “तो मैदानात चारही क्षेत्रात फटके खेळू शकतो. मला खात्री आहे की तो सातत्याने चांगली कामगिरी करून राजस्थानला आयपीएलचा खिताब जिंकून देण्यात मोलाची कामगिरी पार पाडेल. तो भारताकडून तीनही स्वरूपात खेळताना दिसेल अशी मला आशा आहे.”





