ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू गोलंदाज शेन वॉर्नही आता कोरोना व्हायरसनंतर चेंडूला चमकवण्यासाठी थुंकी किंवा घामाचा वापर करावा की नाही या चर्चेत सहभागी झाला आहे. त्याने सर्वांपेक्षा हटके असा एक सल्ला दिला आहे.
वॉर्न (Shane Warne) म्हणाला की, चेंडूच्या एका बाजूचे वजन वाढविले पाहिजे. जेणेकरून वेगवान गोलंदाजांना सपाट खेळपट्टीवरही वारंवार स्विंग गोलदाजी करता येईल. तसेच चेंडू छेडछाडीची प्रकरणेही नष्ट होतील. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या कुकाबुरा कंपनीने म्हटले होते की, ते लवकरच चेंडूला चमकवण्यासाठी वॅक्स ऍप्लीकेटर म्हणजेच मेणाने बनलेले केमिकल घेऊन येत आहेत.
वॉर्नने स्काय स्पोर्ट्स क्रिकेट पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “आपण चेंडूला एका बाजूने वजनदार बनवू शकत नाही का, जेणेकरून चेंडू नेहमी स्विंग होत राहील? हा चेंडू टेप लावलेल्या टेनिस किंवा लॉन चेंडूप्रमाणे असू शकतो. मला नाही वाटत की, वसीम अक्रम आणि वकार युनूसप्रमाणे चेंडूला स्विंग करायचे असू शकेल. परंतु यामुळे वेगवान गोलंदाजांना कसोटीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही सपाट खेळपट्टीवर स्विंग मिळत राहील.”
वॉर्न पुढे म्हणाला की, “क्रिकेटमध्ये प्रगती करण्याचा हा एक योग्य मार्ग आहे. यामुळे चेंडूबरोबर छेडछाडदेखील होणार नाही. इतक्या वर्षात बॅटमध्ये कितीसारे बदल झाले आहेत. ८०च्या दशकात खेळाडूंना आपल्या कारकीर्दीची ज्या बॅटने सुरुवात आणि शेवट केला, त्या दोन्ही बॅटमध्ये खूप अंतर आहे. तेव्हापासून आतापर्यंत बॅटच्या आकारात चढ-उतार होत आहे. परंतु चेंडूत मात्र बदल झाला नाही. चेंडूचे वजन वाढविल्यामुळे बॅटबरोबर संतुलन होऊ शकते.”
याबरोबरच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मार्नस लॅब्यूशानेदेखील (Marnus Labuschagne) कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे चेंडूला थुंकीने चमकवण्याची सवय सोडायला तयार झाला आहे.
तो म्हणाला की, “सर्वांचे ध्येय लवकरच मैदानावर परतणे आहे. त्यासाठी जो बदल करावा लागेल तो केला पाहिजे. युवा खेळाडूंनीही यासाठी सक्षम असले पाहिजे. खेळाडू जेव्हा मैदानावर असतात, तेव्हा त्यांना चेंडूला चमकवण्यासाठी थुंकी लावण्याची सवय असते. अशामध्ये नवीन बदल विचित्र असतील.”
परिस्थिती पाहता कुकाबुरा (Kookaburra) वॅक्स ऍप्लीकेटर तयार करत आहे. हे एका महिन्यात बाजारामध्ये येऊ शकते. कुकाबुरा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रेट एलियट म्हणाले की, “आम्ही चेंडू चमकविण्यासाठी पारंपारिक पद्धतींना बदलण्यासाठी एका वॅक्स ऍप्लीकेटरवर काम करत आहोत. पंचांच्या देखरेखीखाली याचा वापर केला जाऊ शकतो.”
एलियट पुढे म्हणाले की, “स्पंजच्या वरच्या भागात विशिष्ट प्रकारच्या मेणाचे आवरण असेल. हे स्पंज खेळाडू किंवा पंच आपल्या खिशात आरामात ठेवू शकतील.”
ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टने स्पष्ट केले आहे की, भविष्यात चेंडू चमकविण्यासाठी थुंकी, घामाचा वापर करण्यात येऊ शकणार नाही.
माध्यमांतील काही वृत्तांनुसार, आयसीसी (ICC) यावर विचार करत आहे की, क्रिकेट सुरु झाल्यानंतर चेंडू चमकविण्यासाठी पारंपारिक पद्धतींच्या वापरावर बंदी घालण्यात येईल. यामुळे संसर्गाचा अधिक धोका आहे. पर्यायाचा शोध सुरु आहे. असे मानले जात आहे की, कृत्रिम पदार्थांना मंजुरी दिली जाऊ शकते. याच्या वापरावर पंच लक्ष ठेवतील.
ट्रेंडिंग घडामोडी-
-या कारणामुळे भारताचा हा माजी गोलंदाज विराटवर भलताच संतापला
-विराट की धोनी कोण आहे आवडता कर्णधार? अंडर १९ कर्णधार प्रियम गर्ग दिले हे उत्तर
-कोरोना इफेक्ट! या क्रिकेट बोर्डाला बसणार ३६०० कोटींचा फटका? तब्बल ८०० दिवस…