खरं तर क्रिकेटमध्ये सरासरीला खूप मोठं महत्व आहे. नेहमीच असं म्हटलं जातं की ज्याची सरासरी जास्त तो चांगला खेळाडू. खेळाडूंच्या सेवानिवृत्तीनंतर सरासरीचे महत्त्व आणखीच वाढते. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या महानतेचा उल्लेख करणारे बरेचदा त्यांची सरासरी दाखवतात. परंतु क्रिकेटमध्ये असेही खेळाडू आहेत, ज्यांची सरासरी मजेशीर कारणास्तव लक्षात ठेवली जाते. वास्तविक या खेळाडूंची कसोटी क्रिकेटमधील सरासरी ही त्यांच्या सर्वोच्च स्कोअरपेक्षा (धावसंख्या) जास्त असते.
भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत असा फक्त एकच खेळाडू होऊन गेला आहे, ज्याची सरासरी ही त्याच्या सर्वोच्च धावांपेक्षाही जास्त आहे. तो खेळाडू म्हणजेच सदाशिव गणपतराव शिंदे. ज्यांचा जन्म १८ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला होता. भारताकडून एकूण ७ कसोटी सामने खेळणार्या शिंदेंनी आपल्या कारकीर्दीत ७९ प्रथम श्रेणी सामने खेळले. शिंदे प्रथम चर्चेत आले ते म्हणजे १९४३- ४४ च्या दरम्यान. त्यांनी महाराष्ट्राकडून खेळत असताना मुंबईविरुद्ध १८६ धावा देत ५ बळी घेतले. परंतु, शिंदे यांची ही कामगिरी मुंबईतील विजय मर्चंटच्या तिहेरी शतकामुळे (३५९ नाबाद) फारशी चर्चिली गेली नाही.
शिंदे हे एका बांधकाम ठेकेदाराचे पुत्र होते. मुंबईत जन्म झाला असूनही ते पहिला रणजी सामना महाराष्ट्राकडून खेळले होते. क्रिकेट खेळत असतानाच ते बाँबे सचिवालयात क्लार्कची नोकरी करत होते.
फलंदाजीमध्ये नाव
त्या नंतर १९४६ च्या इंग्लंड दौर्यासाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळालं. या दौर्यावर त्यांनी एकूण ३९ बळी घेतले. परंतु हे विकेट्स त्यांनी कसोटीत घेतल्या नव्हत्या. त्यांनी या दौर्यावर फक्त एकच कसोटी खेळले. लॉर्ड्समध्ये खेळलेल्या या कसोटी सामन्यात त्यांची फलंदाजी त्यांच्या गोलंदाजीपेक्षा जास्त चर्चेत होती. शिंदे यांनी शेवटच्या विकेटसाठी रूसी मोदीबरोबर ४३ धावांची भागीदारी केली. तरीही त्यांना काही खास करता आले नाही आणि पुढील पाच वर्षांत त्यांनी फक्त एक कसोटी सामना खेळला.
१९५१- ५२ दरम्यान दिल्ली येथे झालेल्या कसोटी सामन्यात शिंदे यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी जेवणानंतर गोलंदाजीला आलेल्या शिंदे यांनी डॉन केन्यॉनला त्रिफळाचित करुन आपले खाते उघडले. यानंतर, त्यांनी जॅक रॉबर्टसन आणि डोनाल्ड कॅर यांना बाद केले. शिंदे यांनी पहिल्या ८ षटकांत केवळ १६ धावा देऊन ३ गडी बाद केले. नंतर इंग्लंडचा डाव २०३ धावांवर संपुष्टात आला. त्यामध्ये शिंदे यांनी ६ गडी बाद केले.
क्षेत्ररक्षणामध्ये केल्या चुका
पहिल्या डावात भारताने आघाडी घेतली आणि सामना सहज आपल्या बाजूने करून घेतला खरा, पण इंग्लंडच्या दुसर्या डावात भारतीय संघाने अत्यंत खराब क्षेत्ररक्षण केले. असे म्हटले जाते, की त्या दिवशी केवळ शिंदेंच्या गोलंदाजीवर भारताने ७ गडी बाद करण्याची संधी गमावली. विशेषत: यष्टीरक्षक नाना जोशी आणि बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या दत्ताजीराव गायकवाड यांनी त्या दिवशी अतिशय खराब क्षेत्ररक्षण केले. इंग्लंडने कसा तरी सामना वाचविला. परंतु, पहिल्या डावातील चांगल्या कामगिरीचा फायदा शिंदे यांना झाला आणि १९५२ च्या इंग्लंड दौर्यामध्ये भारतीय संघात त्यांना स्थान मिळाले.
Sadashiv Ganpatrao "Sadu" Shinde
(18 August 1923, Bombay – 22 June 1955, Bombay) was an Indian cricketer who played in seven Tests from 1946 to 1952. His daughter, Pratibha Pawar, is the wife of politician Sharad Pawar. pic.twitter.com/WAGtb6o8q1— Dr. Prasanna Patange (@patangeprasanna) June 22, 2020
कसोटीत सर्वोच्च धावांपेक्षा सरासरीच जास्त
या दौर्यावर सुभाष गुप्ते यांच्या जागी शिंदे यांची निवड झाल्याचे सांगण्यात आले होते. कारकिर्दीतील ७ कसोटी सामन्यांमध्ये शिंदेने एकूण १२ बळी घेतले. यात त्यांनी ८५ धावाही केल्या. यावेळी त्यांची सर्वोच्च धावसंख्या ही १४ धावा होती, तर सरासरी १४.१६ होती. अशाप्रकारे ते भारताचे आणि जगातील पहिले असे क्रिकेटपटू होते, ज्यांची सर्वोच्च धावसंख्या ही सरासरीपेक्षाही कमी होती.
शरद पवारांशी नाते
घरगुती क्रिकेटमध्ये शिंदे महाराष्ट्र, मुंबई आणि बडोदाकडून खेळले. प्रथम श्रेणी सामन्यात त्यांनी २३० गडी बाद केले आहेत. २२ जून १९५५ रोजी त्यांचा टायफॉइडमुळे मृत्यू झाला. तेव्हा ते ३१ वर्ष व ३०८ दिवसांचे होते. भारताकडून क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंमध्ये कमी वयात मृत्यु होणारे अमर सिंग (२९ वर्ष १६९ दिवस) व बाका जिलानी (२९ वर्ष व ३४७ दिवस) यानंतर तिसरे दुर्भागी क्रिकेटपटू ठरले होते.
१ ऑगष्ट १९६७रोजी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचा विवाह बारामतीत झाला. प्रतिभाताईंचे माहेरकडे नाव जिजा असे होते. शरद पवारांच्या लग्नापुर्वीच १२ वर्ष आधी सदू शिंदे यांचे निधन झाले होते.
पवारांच्या लग्नाच्या दिवशी बारामतीत प्रचंड पाऊस होता, विशेष म्हणजे विवाह समारंभाला सगळ्या पंचक्रोशीतील माणसे उपस्थित होती. आपल्या आमदाराच्या विवाहाला ते सगळे उत्साहाने आले होते. तत्कालीन मुख्यमंत्रीसुद्धा या सोहळ्याला हजर होते.
शरद पवार नंतर महाराष्ट्र आणि राष्ट्रीय राजकारणातील दिग्गज मंडळींमध्ये सामील झाले. त्यांनी ४ वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. त्याचबरोबर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्षही आहेत. ते बर्याच वर्षांपासून क्रिकेट प्रशासनातही आहेत. शरद पवार यांनी बीसीसीआय आणि आयसीसी यांमध्ये अध्यक्षपद सांभाळले आहे. तसेच त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्येही आपले योगदान दिले आहे.
तुमचे बापजादे रणजी क्रिकेट खेळायचे का?
२०११मध्ये निवडणुकीच्या काळात अजित पवार व राज ठाकरे वाद चांगलेच पेटले होते. राज व उद्धव यांनी कधी नांगर फिरवला आहे का? असा प्रश्न भर सभेत अजितदादांनी केला होता. याला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले होते, अजित पवारांचे बापजादे रणजी क्रिकेट खेळायचे का? बारामतीत राहून तुम्हाला मुंबईतील जागेचे स्क्वेअर फूट कळाले, मग आम्हालाही शेती कळेल.
यावर अजित पवारांनी उत्तर देताना म्हटले होते, माझे आजोबा सदू शिंदे हे क्रिकेटर होते. ते उत्तम स्पिनर होते आणि त्यांनी कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्वही केलंय. त्यांना कमी काळ मिळाला, पण त्यांच्या नावाने आजही पुण्यात सदू शिंदे लीग सुरू आहे.
सासऱ्यांच्या नावानेच पुण्यातील तळजाई टेकडीवर क्रिकेटचे मैदान
पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या धर्तीवर पुणे महापालिकेतर्फे दिवंगत क्रिकेटपटू सदू शिंदे यांच्या नावाने २०१८मध्ये तळजाई टेकडीवर क्रिकेटचे मैदान उभारण्यात आले. या मैदानाचे लोकार्पण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व सदू शिंदे यांचे जावई शरद पवार यांच्या हस्ते २६ नोव्हेंबर २०१८ रोजी करण्यात आले होते.
आपल्या सासऱ्यांच्या नावाने सुरु केलेल्या या मैदानाच्या उद्धाटनावेळी शरद पवार म्हणाले होते, पूर्वी भारतीय संघात मुंबईचेच चेहरे असायचे. आता झारखंडसारख्या राज्यातील खेळाडूही भारतीय संघात असतात. पुण्यातही दि. ब. देवधर तसेच आणखी अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू होते. आता तसे दिसत नाही. याचे कारण मार्गदर्शन मिळत नाही. महापालिकेने शक्य झाले तर वेतन देऊन दोन प्रशिक्षक ठेवावेत व गरीब मुलांना प्रशिक्षण द्यावे. तर पुण्यातूनही अनेक खेळाडू भारतीय संघात दिसतील.
आणखी एक खेळाडू; ज्याची सरासरी आहे सर्वोच्च धावांपेक्षाही अधिक
शिंदे यांच्या व्यतिरिक्त एक क्रिकेटपटू आहे, ज्याची कसोटी क्रिकेटमधील सरासरी त्याच्या सर्वोच्च धावांपेक्षा जास्त आहे. पाकिस्तानकडून खेळलेल्या अँटाओ डिसूझाने ६ कसोटीत एकूण ७६ धावा केल्या आहेत. यावेळी त्याची सर्वोच्च धावसंख्या २३ होती, तर सरासरी ३८ इतकी होती.
हेही वाचा-