भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुर (shardul thakur) याने जोहान्सबर्ग कसोटीत गोलंदाजीपाठोपाठ फलंदाजीतही अप्रतिम प्रदर्शन केले. पहिल्या डावात त्याने सात विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या डावात २४ चेंडूत २८ धावा करून महत्वपूर्ण योगदान दिले. शार्दुलने आतापर्यंत केलेल्या त्याच्या तिन्ही विदेशी दौऱ्यांमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. मागच्या काही काळामध्ये त्याने फलंदाजीत खूप सुधारणा केल्याचे दिसते. चेन्नई सुपर किंग्जेच माजी प्रशिक्षक एरिक सिमन्स (eric simmons) यांनी शार्दुलच्या फलंदाजीतील सुधारणेचे कारण स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी आयपीएल २०१९ च्या अंतिम सामन्याची आठवण करून दिली.
आयपीएल २०१९ च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या विजयासाठी दोन धावांची आवश्यकता होती. मात्र, शार्दुल शेवटच्या चेंडूवर बाद झाला होता. चेन्नईचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक जोहान्सबर्ग कसोटीदरम्यान समालोचन करताना म्हणाले की, “मला शार्दुलच्या फलंदाजीची कथा सांगायची आहे. यातून त्याच्या स्वभावाची माहिती मिळते. तो त्याच फ्रेंचायझीमध्ये होता, ज्यामध्ये मी होतो. दोन वर्षांपूर्वी आयपीएलच्या अंतिम सामन्यात आम्हाला शेवटच्या चेंडूवर टाय करण्यासाठी एक आणि विजयासाठी दोन धावा पाहिजे होत्या. तो खेळपट्टीवर गेला. त्याच्यासमोर लसिथ मलिंगा होता आणि तो शेवटच्या चेंडूवर बाद झाला. त्या सामन्यातील पराभवानंतर तो खचला होता.”
“मला माहिती नाही किती वेळ, पण तो एका कोपऱ्यात बसून राहिला. हा त्याचा स्वभाव आहे. कोणीच त्याला काही बोलले नाही, कोणीच म्हटले नाही की, ही तुझी चूक नाहीय. त्याने त्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. मला हे सांगायचे आहे की, त्या सामन्यामुळे त्याच्यात काय बदल झाला? त्याने निर्णय घेतला की, इथून पुढे असे पुन्हा होणार नाही. त्यामुळेच तो असा फलंदाज बनला आहे. त्याने फलंदाजीवर खूप मेहनत केली आहे. हे त्याच्या स्वभावाविषयी सांगते की, तो कसा त्या परिस्थितीतून बाहेर आला,” असे एरिक सिमन्स पुढे बोलताना म्हणाले.
दरम्यान, शार्दुलच्या फलंदाजी प्रदर्शनाचा विचार केला, तर त्याने ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात अर्धशतक केले होते आणि भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. तसेच इंग्लंड दौऱ्यातील द ओवल कसोटी सामन्यातील दोन्ही डावांमध्ये त्याने अर्धशतकी खेळी केली होती. त्याच्या प्रदर्शनाच्या जोरावर भारताने इंग्लंडला मात दिली होती.
महत्वाच्या बातम्या –
पीएमडीटीए मानांकन वरिष्ठ व हौशी टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत अमित शर्माला विजेतेपद
‘लॉर्ड’ उपाधी मागील खरे कारण काय? का मिळतंय घवघवीत यश? शार्दुल ठाकूरनेच केलाय खुलासा
व्हिडिओ पाहा –