भारताचा कसोटी हंगाम 19 सप्टेंबरपासून सुरू होणार असून टीम इंडिया सर्वप्रथम बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. या मालिकेनंतर टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. यानंतर भारतीय संघ 5 सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाईल.
टीम इंडियाचं हे व्यस्त सीझन सुरू होण्यापूर्वी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वास्तविक, वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर पुनरागमनासाठी सज्ज आहे. शार्दुलनं नुकतंच स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आणि आता तो इराणी चषकात खेळताना दिसू शकतो.
शार्दुल ठाकूर शेवटचा आयपीएल 2024 मध्ये खेळला होता. त्यानंतर तो जखमी झाला. नंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे तो दुलीप ट्रॉफीत खेळू शकला नाही. मात्र, आता शार्दुलनं शस्त्रक्रियेनंतरची रिकव्हरी पूर्ण केली असून तो पुन्हा एकदा मैदानावर पुनरागमनास तयार झाला आहे.
शार्दुल अलीकडेच बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर केएससीए सचिव 11 विरुद्ध मुंबईसाठी खेळला होता. मात्र, त्याची कामगिरी फारशी खास राहिली नव्हती. शार्दुलनं फलंदाजी करताना दोन चेंडूंचा सामना केला, ज्यावर तो एकही धाव न काढता बाद झाला. तर गोलंदाजीत त्यानं आठ षटकांत एकही विकेट न घेता 29 धावा दिल्या.
2024 इराणी चषक मुंबईहून लखनऊला हलवण्यात आला आहे. या स्पर्धेचे सामने 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान एकना स्टेडियमवर होतील. यामध्ये यंदाच्या रणजी ट्रॉफी चॅम्पियन मुंबईचा सामना ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघाशी होईल. या सामन्यात शार्दुल ठाकूर मुंबईकडून खेळण्याची शक्यता आहे.
शार्दुलचं पुनरागमन टीम इंडियासाठी दिलासादायक ठरू शकतं. याचं कारण म्हणजे, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताला वेगवान अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता भासेल. शार्दुल गोलंदाजीसह फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. त्यामुळे त्याचं महत्त्व वाढतं. शिवाय शार्दुलनं विदेशी खेळपट्ट्यांवर टीम इंडियासाठी नेहमीच चांगली कामगिरी केली आहे.
हेही वाचा –
4,4,4,4,4….बाबर आझमनं नवख्या गोलंदाजावर काढला राग; तरीही संघाचा पराभव
भारतीय क्रिकेटचा पुढील सुपरस्टार कोण? ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केली निवड
भारत-बांगलादेश कसोटी मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक; कधी आणि कुठे होणार सामने? सर्वकाही जाणून घ्या