टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शार्दुल ठाकूर सध्या रणजी ट्रॉफी खेळत आहे. सोशल मीडियावर तो ‘लॉर्ड ठाकूर’ या टोपण नावानं ओळखला जातो. शार्दुलनं वेळोवेळी भारतीय संघासाठी अनेक उपयोगी खेळी खेळल्या आहेत. त्यामुळे चाहत्यांनी त्याला हे टोपण नाव दिलंय.
शार्दुल ठाकूरचं टोपण नाव जेवढं रंजक आहे, तेवढीच रंजक आहे त्याची लव्ह स्टोरी! शार्दुलनं 2023 मध्ये त्याच्या गर्लफ्रेंडशी लग्न केलं. हे दोघं एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. हे दोघे शाळेत पहिल्यांदा एकमेकांना भेटले. तेथे त्यांच्या मैत्रीचा पाया घातला गेला. मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं.
शार्दुलच्या पत्नीचं नाव मिताली परुलकर आहे. या दोघांची 2021 मध्ये मुंबईत एंगेजमेंट झाली होती. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 2022 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकानंतर दोघं लग्न करणार होते. मात्र काही कारणास्तव तारीख पुढे ढकलावी लागली. यानंतर 27 फेब्रुवारी 2023 रोजी दोघांनी लग्न केलं. विशेष म्हणजे, शार्दुलची पत्नी बिझनेसवुमन आहे. तिचं स्वतःचं स्टार्टअप आहे.
शार्दुल ठाकूर सध्या रणजी फायनल खेळत आहे. मुंबईच्या पहिल्या डावात शार्दुल ठाकूर फलंदाजीला आला तेव्हा संघाच्या 6 विकेट पडल्या होत्या. ठाकूर 8 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यानं 69 चेंडूंचा सामना करत 75 धावांची खेळी खेळली. या खेळीत त्यानं 8 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट 100 पेक्षा जास्त होता.
शार्दुल आयपीएल 2024 मध्ये एमएस धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळताना दिसेल. संघानं त्याला 4 कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केलं आहे. यापूर्वी, तो 2018 ते 2021 हंगामात सीएसकेकडून खेळला होता. शार्दुलनं आपल्या 7 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत भारतासाठी 11 कसोटी, 47 एकदिवसीय आणि 25 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये चार अर्धशतकांच्या मदतीनं 331 धावा करण्यासोबतच त्यानं 28.38 च्या सरासरीनं 31 विकेट्सही घेतल्या आहेत. शार्दुलच्या नावावर एकदिवसीय सामन्यात 329 धावा आणि 65 बळी तर टी-20 मध्ये 69 धावा आणि 33 विकेट आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई-विदर्भातील अंतिम सामना अनिर्णित राहिला तर कोण होणार रणजी चॅम्पियन? जाणून घ्या
‘मिरॅकल मॅन’! अपघातानंतर ऋषभ पंतच्या कमबॅकवर बीसीसीआयची डॉक्युमेंट्री, ‘या’ तारखेला होणार रिलीज