भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी (१३ ऑक्टोबर) टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघातील बदलाबाबत मोठी घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी १५ जणांच्या भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला भारताच्या १५ जणांच्या संघात स्थान देण्यात आले आहे.
शार्दुलला अष्टपैलू अक्षर पटेल ऐवजी संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे आता अक्षर मुख्य १५ जणांच्या संघातून बाहेर झाला असून तो आता राखीव खेळाडू असेल. यापूर्वी शार्दुलचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश होता. पण आता त्याला मुख्य संघात घेण्यात आले आहे. शार्दुलने गेल्या काही दिवसात चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे त्याला टी२० विश्वचषकासाठी संघात स्थान देण्याची मागणी जोरदार होत होती.
याशिवाय बीसीसीआयने माहिती दिली आहे की अवेश खान, उम्रान मलिक, हर्षल पटेल, लुकमन मेरीवाला, व्यंकटेश अय्यर, कर्ण शर्मा, शाहबाज अहमद आणि कृष्णप्पा गॉथम हे खेळाडू भारतीय संघाला टी२० विश्वचषकाची तयारी करण्यासाठी मदत करतील. त्यामुळे ते भारतीय संघाच्या बायोबबलमध्येच असतील. थोडक्यात हे खेळाडू नेटमध्ये भारतीय संघातील खेळाडूंना सराव देतील.
टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ या विश्वचषकातील आपली मोहिम २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करेल. या विश्वचषकात आधी पहिली फेरी (पात्रता फेरी) होईल. त्यानंतर २३ ऑक्टोबरपासून सुपर १२ फेरीला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ सुपर १२ फेरीसाठी थेट पात्र ठरला आहे.
टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू – श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दिपक चाहर
भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक-
सुपर १२ फेरी –
२४ ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई ( संध्या- ७.३० वाजता)
३१ ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई ( संध्या- ७.३० वाजता)
३ नोव्हेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, अबुधाबी ( संध्या- ७.३० वाजता)
५ नोव्हेंबर – भारत विरुद्ध ब गटातील अव्वल संघ, दुबई ( संध्या- ७.३० वाजता)
८ नोव्हेंबर – भारत विरुद्ध अ गटातील अव्वल संघ, दुबई ( संध्या- ७.३० वाजता)
बाद फेरी –
१० नोव्हेंबर – उपांत्य सामना – १, अबुधाबी ( संध्या- ६.०० वाजता)
११ नोव्हेंबर – उपांत्य सामना – २, दुबई ( संध्या- ६.०० वाजता)
१४ नोव्हेंबर – अंतिम सामना, दुबई ( संध्या- ६.०० वाजता)