भारताची सतरा वर्षीय युवा महिला क्रिकेटपटू शेफाली वर्मा सध्या इंग्लंड येथे ‘द हंड्रेड क्रिकेट लीग’ खेळत आहे. सोमवारी (०९ ऑगस्ट) तिने धमाकेदार कामगिरी करत तिचा संघ बर्मिंघम फिनिक्सला विजय मिळवून दिला. एजबॅस्टन येथे वेल्स फायर आणि बर्मिंघम फिनिक्स या महिला क्रिकेट संघांमध्ये हंड्रेड लीगचा 23 वा सामना खेळला गेला. यामध्ये शेफालीच्या संघाने 10 गडी राखून दणदणीत विजयाची नोंद केली.
वेल्स फायर संघाने प्रथम फलंदाजी करताना 100 चेंडूत 9 गडी गमावून 127 धावा केल्या होत्या. यात सलामीवीर ब्रायनी स्मिथच्या 38 धावांच्या उपयुक्त खेळीचा समावेश होता. बर्मिंघम संघाला विजयासाठी 128 धावांचे लक्ष्य मिळाले होते. त्यांनी ते फक्त 76 चेंडूत साध्य केले. यात शेफालीचे बहुमुल्य योगदान होते. तिने अवघ्या 22 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. तसेच पुढे आपली आक्रमक खेळी कायम राखत तिने डावाखेर नाबाद 76 धावांची खेळी केली. तिने या डावात 42 चेंडूंचा सामना केला आणि त्यात 9 चौकार व 2 षटकार मारले.
याचबरोबर शेफालीने संघसहकारी एव्हलिन जोन्ससोबत नाबाद 131 धावांची सलामी भागीदारी केली. एकही बळी न गमावता त्यांनी विजयश्री खेचून आणली. ही सलामी भागीदारी करत त्यांनी या लीगमध्ये सर्वोच्च भागिदारीचा विक्रम नोंदवला आहे. एव्हलिनने 35 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या होत्या. तिने आपल्या खेळीत नऊ चौकार लगावले. शेफालीला तिच्या कामगिरासाठी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
The highest batting partnership in #TheHundred.
Birmingham, you've been looked after! 😍 pic.twitter.com/c3Se5TxmYG
— The Hundred (@thehundred) August 9, 2021
बर्मिंघम संघाचा हा आतापर्यंतच्या सहा सामन्यांतील दुसरा विजय होता. तर वेल्स फायरला सहा सामन्यांमध्ये चौथा पराभव स्वीकारावा लागला आहे. 8 संघांच्या गुणतालिकेत बर्मिंघम फिनिक्स पाचव्या क्रमांकावर आहे. तर वेल्स फायर सातव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 4-4 गुण आहेत. या लीगचा अंतिम सामना 21 ऑगस्टला लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आतापर्यंत २ आयपीएल फ्रँचायझींचा कॉल आला आहे,’ भारताविरुद्ध चमकलेल्या श्रीलंकन खेळाडूचा खुलासा
आयपीएलची नवी नियमावली वाचलीत का? स्टँडमध्ये चेंडू गेल्यास त्याने नाही खेळला जाणार सामना