तब्बल सात वर्षांनंतर महिला क्रिकेटने कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ इंग्लंड महिला संघाविरुद्ध सात वर्षांनंतर कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात अनेक खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केले आहे. या कसोटी सामन्याला १६ जूनपासून सुरुवात झाली असून १९ जूनपर्यंत खेळला जाणार आहे.
या सामन्यात भारतीय संघासाठी पदार्पण करणारी शेफाली वर्माने पहिल्या डावात ९६ धावांची जोरदार खेळी केली आहे. या खेळीने शेफाली वर्माने भारतीय पुरुष संघातील माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविडची आठवण करून दिली आहे. या खेळीनंतर अनेकांनी शेफाली वर्माची तुलना राहुल द्रविडसोबत केली आहे.
शेफाली वर्मा आणि राहुल द्रविड हे दोघेही उजव्या हाताने फलंदाजी करतात. दोंघांनीही आपले कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण इंग्लंड संघाविरुद्ध केले होते. राहुल द्रविडने जून १९९६ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात पहिल्या डावात तो २६७ चेंडूत ९५ धावा ठोकत बाद झाला होता.
त्याचबरोबर आता शेफाली वर्मानेही २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले आहे. शेफाली १५२ चेंडूत ९६ धावांची खेळी करून बाद झाली. तिचे शतक केवळ चार धावांनी हुकले. जरी राहुल आणि शेफालीमध्ये समानता असली, तरीही या युवा क्रिकेटपटूची शैली वीरेंद्र सेहवागसारखी आहे. म्हणूनच जेव्हा शेफालीने स्फोटक शैलीत ९० धावांचा टप्पा ओलांडला, तेव्हा तिला ‘लेडी सेहवाग’ म्हणून सोशल मीडियावर संबोधले गेले.
शेफाली वर्माने आपल्या टी- 20 च्या स्फोटक शैलीत कसोटीचा डाव सुरू केला. सावकाश न खेळता तिने वीरेंद्र सेहवागसारख्या वेगवान धावा करण्यास सुरुवात केली. शेफाली आणि स्मृती मंधानाने ४८.५ षटकांपर्यंत पहिल्या विकेटच्या भागीदारीत १६७ धावा जोडत भारतीय संघाला जोरदार सुरुवात दिली.
शेफालीने नेहमीप्रमाणे आक्रमक शैलीत डावाची सुरुवात केली. तिने उत्तम असे कट आणि पूल शॉट मारले. या १७ वर्षीय महिला खेळाडूने खेळी दरम्यान डिफेन्स ही चांगला केला आणि एक मोठा षटकारही खेचला. कसोटी क्रिकेटमध्ये हा भारतीय महिलांचा केवळ दुसरा षटकार होता. शेफालीने तिच्या ९६ धावांच्या खेळी दरम्यान १३ चौकार आणि २ षटकार मारले.
वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हरियाणाच्या शेफाली वर्माने त्याप्रकारे वर्चस्व गाजवले आहे, ज्याप्रकारे आधी वीरेंद्र सेहवागचे आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्चस्व होते. महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही तिचे कौतुक केले होते आणि म्हटले होते की, “जेव्हा शेफाली वर्मा खेळपट्टीवर असेल, तेव्हा ती तिच्या कौशल्य व फटकार मारण्याच्या क्षमतेने प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकते.”
भारतीय युवा फलंदाज शेफाली वर्मा ही महिला फलंदाजांच्या टी-२० क्रमवारीत प्रथम स्थानी आहे. तिचे या यादीत ७७६ गुण आहेत. याव्यतिरिक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे, ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी (७४४) आणि मेग लैनिंग ( ७०९) आहेत.
महत्वाच्या बातम्या
WTC Final: कोहली अन् शास्त्रींची प्लेइंग इलेव्हनची निवड फसली? साउथम्पटनची खेळपट्टी करतेय इशारा
नादच खुळा! अश्विन- जडेजाची जोडी बनेल भारतीय संघासाठी ब्रह्मास्त्र, ३५ कसोटीत घेतल्यात ३६२ विकेट्स
भारत-न्यूझीलंड फायनलवर संकटाचे ‘काळे ढग’, पहिल्या दिवसाचा खेळ उशिरा सुरू होण्याचे संकेत