भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्यात १९८३ च्या विश्वचषकाची सर्वात मोठी भूमिका मानली जाते. लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने विश्वचषक उंचावला आणि जागतिक क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने क्रांती झाली. क्रिकेटमध्ये पैसा आणि इतर सर्व लखलखाट आणणाऱ्या बाबी या स्पर्धेनंतर सुरू झाल्या. मात्र, भारताने हा विश्वचषक जिंकण्याचे सर्वात मोठे कारण आणि प्रेरणास्थान होते खुद्द संघाचे कर्णधार कपिल देव. आधीच्या दोन विश्वचषकात केवळ हजेरी लावण्याचे काम केलेल्या भारतीय संघाने कपिल देव यांच्या एका अचंबित करणाऱ्या खेळीने भारतीय संघात असा काही जोश भरला की, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना भारतीय संघाने विश्वविजेतेपदावर आपला हक्क सांगितला. कपिल देव यांनी केलेल्या त्या अजरामर खेळीला आज ३८ वर्ष पूर्ण होत आहेत.
भारतीय संघासाठी उपांत्य फेरीचा मार्ग झालेला खडतर
विश्वचषकाच्या सुरुवातीला ब गटात दोन उलटफेर झाले होते. प्रथमच विश्वचषक खेळणाऱ्या झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला तर, भारताने गतविजेत्या वेस्ट इंडिजला मात दिली होती. त्यानंतर, भारतीय संघाने झिम्बाब्वेला पराभूत केले. मात्र, ऑस्ट्रेलियाकडून १६२ धावांनी हार पत्करावी लागली. स्पर्धेच्या प्रारुपानुसार गटातील संघ एकमेकाशी दोनदा भिडणार होते. परतीच्या सामन्यात वेस्ट इंडीजने भारताला पराभूत करत, पुन्हा एकदा उपांत्य फेरीत धडक मारली. परंतु, सलग दोन पराभवांमुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली होती.
भारताची आश्चर्यकारक घसरगुंडी
झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघासाठी ‘करा अथवा मरा’ अशी परिस्थिती निर्माण झाली होती. भारताला ट्रेंटब्रिजच्या या मैदानावर कोणत्याही परिस्थितीत विजय हवा होता.
विजयाचे ध्येय घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला मिळालेली सुरुवात अगदीच अनपेक्षित होती. रॉसन व केविन करन (टॉम आणि सॅम करनचे पिता) यांनी भारताची व्यवस्था ४ बाद ९ अशी दयनीय करून टाकली. सुनील गावसकर व के. श्रीकांत हे अनुभवी सलामीवीर खातेही न खोलता माघारी परतले. मोहिंदर अमरनाथ व संदीप पाटील यांनी देखील फक्त मैदानात देण्याचे सोपस्कार पूर्ण केले.
भारताच्या अशा दाणादाण उडालेल्या परिस्थितीत मैदानात आगमन झाले ते कर्णधार कपिल देव निखंज यांचे. भारत दुबळ्या झिम्बाब्वेकडून पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. संघाच्या १७ धावा होत आहेत तोपर्यंत यशपाल शर्मा यांनीदेखील तंबूचा रस्ता धरला.
तो आला त्याने पाहिलं त्याने जिंकलं
भारतीय संघाला या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी काहीतरी चमत्कार होणे अपेक्षित होते. मात्र, हा चमत्कारदेखील संघातील कोणत्यातरी खेळाडूलाच करायचा होता आणि ही जबाबदारी कर्णधाराने स्वतःच्या खांद्यावर उचलली. ट्रेंटब्रिजच्या मैदानावर त्यानंतर ‘हरियाणा हरिकेन’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या कपिल यांनी खऱ्या अर्थाने वादळ आणले. तळाच्या फलंदाजांना साथीला घेत ट्रेंटब्रिजच्या मैदानावरील प्रत्येक कोपऱ्यात झिम्बाब्वेच्या क्षेत्ररक्षकांना पळायला भाग पाडत अवघ्या १३८ चेंडूमध्ये १६ खणखणीत चौकार व ६ गगनचुंबी षटकाऱ्यांच्या सहाय्याने नाबाद १७५ धावांची खेळी साकारली. अशी खेळी यापूर्वी क्रिकेट जगताने कधीही पाहिली नव्हती. भारताने ६० षटकात ८ बाद २६६ धावा धावा फलकावर लावण्यात यश मिळवले.
सामना जिंकल्यानंतर विश्वचषकापर्यंत मारली मजल
भारताने दिलेले हे आव्हान झिम्बाब्वेला बेलवले नाही व ते ३१ धावांनी पराभूत झाले. पुढच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अविस्मरणीय कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याचा कारनामा केला आणि पहिल्यांदाच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत यजमान इंग्लंडला आणि अंतिम फेरीत गतविजेत्या वेस्ट इंडिजला पराभूत करत भारताने ‘जगज्जेते’ होण्याचा मान मिळवला.
दुर्दैवाने फक्त स्कोअर बुकवर राहिली ही खेळी
कपिल देव यांची १७५ धावांची ‘न भुतो’ अशी खेळी ही फक्त स्कोअर बुकमध्येच राहिली. कारण, १८ जून १९८३ रोजी स्पर्धेचे प्रक्षेपण करणार्या बीबीसीच्या कर्मचाऱ्यांचा संप होता. त्यामुळे या स्पर्धेचे चित्रीकरण अथवा रेडिओ प्रसारण देखील झाले नाही. परंतु, असे असले तरी या खेळाविषयी वाचून आजही युवा क्रिकेटपटू आणि चाहत्यांच्या अंगावर काटा उभा राहतो.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता! आयपीएलच्या आयोजनासाठी ‘या’ मोठ्या स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल
‘लेडी सेहवाग’ १०-१५ रुपयांसाठी मारायची चौकार-षटकार, स्वत:चं केला खुलासा
WTC Final: एमएस धोनीला ‘या’ विक्रमात मागे टाकत विराट कोहली पटकवणार अव्वल स्थान






