पुणे: डिव्हाईन स्टार्स ग्रुप, पुणे व एक्सेल इंजिनिअर्स अँड कन्सलटंटस यांच्या तर्फे आयोजित पहिल्या एक्सेल टी-20 महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत शेलार ग्रुप, डिव्हाईन स्टार्स या संघांनी अनुक्रमे रिग्रीन व मेटा स्कुल या संघांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर सूरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सोनिया डबीर हिने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर शेलार ग्रुप संघाने रिग्रीन संघाचा 9 गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली.
सामन्यात शेलार ग्रुपच्या अचूक गोलंदाजी व क्षेत्ररक्षणापुढे रिग्रीन संघाचा डाव गडगडला. त्यांचे फलंदाज झटपट बाद होत गेल्याने रिग्रीन संघाला 20षटकात 8बाद 66धावाच करता आल्या. भक्ती शास्त्रीच्या 17धावा व तेजल हसबनीसच्या 12धावा वगळता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही.
शेलार ग्रुपकडून वैष्णवी काळेने 4धावांत 4गडी बाद केले. वैष्णवीला सोनिया डबीर(1-14), श्वेता खटाळ(1-14), कृतिका पोफल्ली(1-19)यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून सुरेख साथ दिली. शेलार ग्रुप संघाने हे आव्हान 10.5षटकात 1बाद 67धावा करून पूर्ण केले.
यात सोनिया डबीरने 41 चेंडूत नाबाद 45धावा, कृतिका पोफल्लीने 20 चेंडूत नाबाद 11धावा करून संघाला विजय मिळवून दिला.सामन्याची मानकरी सोनिया डबीर ठरली.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारती फुलमाळीच्या उपयुक्त 39धावांच्या जोरावर डिव्हाईन स्टार्स संघाने मेटा स्कुल संघाचा 7 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. पहिल्यांदा खेळताना मेटा स्कुल संघाचा डाव 18.4षटकात 71धावावर कोसळला.
यात उत्कर्षा पवारने 19धावा, पूनम खेमनारने 15धावा केल्या. डिव्हाईन स्टार्सकडून निकिता भोर(3-7), प्रिया सिंग(2-14), साक्षी वाघमोडे(1-10), गौतमी नाईक(1-10), आदिती गायकवाड(1-16) यांनी अफलातून गोलंदाजी करत मेटा स्कुल संघाला 71धावांवर रोखले.
71 धावांचे आव्हान डिव्हाईन स्टार्स संघाने 14.2षटकात 3गड्यांच्या बदल्यात 74धावा काढून पूर्ण केले. यात भारती फुलमाळीने 39चेंडूत 4चौकारांसह 39धावांची संयमपूर्ण खेळी केली. क्रतिका टेकाडेने 16धावा, वैष्णवी रावलीयाने 10धावा करून संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. सामन्याची मानकरी भारती फुलमाळी ठरली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
रिग्रीन: 20षटकात 8बाद 66धावा(भक्ती शास्त्री 17(27,2×4), तेजल हसबनीस 12(17,1×4), वैष्णवी काळे 4-4, सोनिया डबीर 1-14, श्वेता खटाळ 1-14, कृतिका पोफल्ली 1-19)
पराभूत वि.शेलार ग्रुप: 10.5षटकात 1बाद 67धावा(सोनिया डबीर नाबाद 45(41,7×4), कृतिका पोफल्ली नाबाद 11(20,1×4), श्रद्धा पाखरकर 1-15);सामनावीर-सोनिया डबीर;
मेटा स्कुल: 18.4षटकात सर्वबाद 71धावा(उत्कर्षा पवार 19(28,1×4), पूनम खेमनार 15(31), निकिता भोर 3-7, प्रिया सिंग 2-14, साक्षी वाघमोडे 1-10, गौतमी नाईक 1-10, आदिती गायकवाड 1-16)
पराभूत वि.डिव्हाईन स्टार्स: 14.2षटकात 3बाद 74धावा(भारती फुलमाळी 39(39,4×4), क्रतिका टेकाडे 16(20,2×4), वैष्णवी रावलीया 10(21,2×4), कल्याणी चावरकर 1-7, श्रुती महाबळेश्वर 1-9, सोनाली शिंदे 1-15);सामनावीर- भारती फुलमाळी.