कोणत्याही क्रिकेट संघात टिकून राखण्यासाठी खेळाडूंना सातत्याने चांगली कामगिरी करावी लागते. परंतु बऱ्याचदा खेळाडूच्या एखाद्या सामन्यातील खराब प्रदर्शनामुळेही त्याला मोठ्या नुकसानाला सामोरे लागते. असेच काहीसे वेस्ट इंडिज आणि आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाबचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल याच्यासोबत घडले आहे.
इंग्लंडमध्ये २०१९ साली झालेल्या विश्वचषकात डावखुरा वेगवान गोलंदाज कॉट्रेलने तब्बल १२ विकेट्स चटकावल्या होत्या. त्याच्या या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर त्याला जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल २०२० मध्ये संधी मिळाली होती. केएल राहुलच्या नेतृत्त्वाखालील पंजाब संघाने ८ कोटी ५० लाखांच्या मोठ्या किंमतीला त्याला विकत घेतले होते.
परंतु शारजाहमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या साखळी फेरी सामन्याने कॉट्रेलच्या नशिबाचे ग्रह फिरले. या सामन्यातील कॉट्रेलच्या एका षटकात राजस्थानचा धुरंधर राहुल तेवतियाने तब्बल ५ षटकार खेचले. यासह त्याने पूर्ण सामन्यात ३१ चेंडूत ५३ धावा चोपल्या आणि ३ चेंडू राखत ४ विकेट्सने संघाला विजय मिळवून दिला. तेवतियाने केलेल्या धुलाईमुळे कॉट्रेलने त्या सामन्यात ३ षटकात चक्क ५२ धावा दिल्या आणि अवघी १ विकेट घेतली.
कॉट्रेलच्या या खराब गोलंदाजी प्रदर्शनामुळे पुढे त्याला अधिकतर सामन्यात बाकावर बसवण्यात आले. आयपीएल २०२० च्या पूर्ण हंगामात त्याने फक्त ६ सामने खेळले. त्यातही १७६ धावा देत त्याने केवळ ६ विकेट्सची खात्यात नोंद केली.
एवढेच काय कमी होते की, कॉट्रेलला यंदाच्या आयपीएल लिलावात कोणीही खरेदीदार नाही मिळाला. १ कोटीच्या मुळ किंमतीसह लिलावात उतरलेल्या कॉट्रेलवर त्याच्या पंजाब संघानेही बोली लावली नाही. त्यामुळे यंदा तो अनसोल्ड राहिला.
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका! आयपीएल सोडून देशासाठी क्रिकेट खेळणार कागिसो रबाडा?