मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात (IPL 2022) ३८ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्सने ११ धावांनी विजय मिळवला. पंजाबच्या या विजयात सलामीवीर शिखर धवनने मोलाचा वाटा उचलला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी करत सामनावीराचा पुरस्कार जिंकला. याबरोबरच त्याने काही विक्रमही आपल्या नावावर केले.
शिखरचा चेन्नईविरुद्ध मोठा विक्रम
चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सकडून शिखर धवनने (Shikhar Dhawan) ५९ चेंडूत ८८ धावांची नाबाद खेळी करताना ९ चौकार आणि २ षटकार मारले. याबरोबरच त्याने चेन्नईविरुद्ध १००० धावा पूर्ण करण्याचाही टप्पा पार केला. आयपीएलमध्ये एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध १००० धावांचा टप्पा पार करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याने चेन्नईविरुद्ध आयपीएलमध्ये १०२९ धावा केल्या आहेत.
यापूर्वी रोहित शर्माने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध १०१८ धावा केल्या आहेत. तसेच डेव्हिड वॉर्नरने (David Warner) पंजाब किंग्सविरुद्ध १००५ धावा केल्या आहेत. या तीन खेळाडूंनाच आयपीएलमध्ये एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध १००० धावांचा टप्पा ओलांडता आलेला आहे (Most runs against an opponent in the IPL).
आयपीएलमध्ये एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू
१०२९ धावा शिखर धवन विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
१०१८ धावा रोहित शर्मा विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
१००५ धावा डेव्हिड वॉर्नर विरुद्ध पंजाब किंग्स
९७८ धावा डेव्हिड वॉर्नर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
९४९ धावा विराट कोहली विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
विराटच्या पंक्तीत स्थान
शिखरने ही अर्धशतकी खेळी करताना आयपीएलमध्ये ६००० धावांचा टप्पाही ओलांडला. हा टप्पा ओलांडणारा तो विराट कोहलीनंतरचा (Virat Kohli) दुसराच खेळाडू ठरला. विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असून त्याने आत्तापर्यंत २१५ सामन्यांत ६४०२ आयपीएल धावा केल्या आहेत. तसेच शिखरच्या आता आयपीएलमध्ये २०० सामन्यांत ६०८६ धावा झाल्या आहेत (Most IPL Runs).
इतकेच नाही, तर शिखरने त्याच्या टी२० कारकिर्दीत ९००० धावा पूर्ण करण्याचाही टप्पा पार केला आहे. असा पराक्रम करणारा तो तिसराच भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी विराटने १०३९२ धावा आणि रोहितने (Rohit Sharma) १००४८ धावा टी२० क्रिकेटमध्ये केल्या आहेत. शिखरच्या नावावर ९०७७ टी२० धावा आहेत (Most T20 runs).
पंजाबने जिंकला सामना
सोमवारी झालेल्या सामन्यात पंजाबने चेन्नईसमोर शिखरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २० षटकांत ४ बाद १८७ धावा करत १८८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला २० षटकांत ६ बाद १७६ धावाच करता आल्या. चेन्नईकडून अंबाती रायुडूने ७८ धावांची खेळी केली. मात्र, अन्य कोणाला फार काही करता आले नाही. त्यामुळे पंजाबने ११ धावांनी विजय मिळवला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
IPL| चेन्नईविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्यात पंजाब दुसऱ्या क्रमांकावर, यादीत ‘हा’ संघ अव्वल
नशीब बलवत्तर! पंजाबच्या फलंदाजाला २ वेळा मिळाले जीवनदान, सीएसकेच्या खेळाडूंनी सोडले सोपे झेल
वयाच्या ६६व्या वर्षी भारताचा माजी क्रिकेटपटू करणार दुसरे लग्न, नवरीचे वय ऐकून बसेल धक्का