मुंबई । गेल्या दोन वर्षांपासून कसोटी संघातून बाहेर असलेला सलामीवीर शिखर धवनने भारतीय संघात पुनरागमन करण्याची आशा सोडली नाही. मिळणार्या संधींचा फायदा करून कसोटी संघात स्थान मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे धवनने सांगितले. सप्टेंबर 2018 मध्ये ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध 34 वर्षीय धवनने शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
धवनने एका टीव्ही चॅनेलला सांगितले की, मी कसोटी संघाचा भाग नाही, याचा अर्थ असा नाही की मी पुनरागमन करण्याची आशा सोडली आहे. तो म्हणाला, “जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी त्याचा फायदा घेतला आहे. मागील वर्षी मी रणजी ट्रॉफीमध्ये शतक ठोकले होते आणि वनडे संघात पुनरागमन केले. मला संधी मिळाली तर मी नक्कीच ते करू शकतो.”
रोहित शर्मा, केएल राहुल, मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ या दर्जेदार खेळाडूंमुळे कसोटी संघात सलामीवीरांसाठी बरीच स्पर्धा आहे, पण हा डावखुरा फलंदाज अजूनही आशावादी आहे. तो म्हणाला, “मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत राहीन. पुढच्या वर्षी टी -20 विश्वचषक आहे. त्यामुळे मला सतत कामगिरी करत राहावे लागेल, स्वत: ला तंदुरुस्त ठेवावे लागेल आणि सतत धावा कराव्या लागतील. जर मी हे करण्यात यशस्वी ठरलो तर त्या गोष्टीचा मला वैयक्तिकरित्या फायदा होईल.”
धवनने आतापर्यंत 34 कसोटी सामन्यांमध्ये 40.61च्या सरासरीने 2315 धावा केल्या असून त्यात सात शतकेही केली आहेत. अजूनही तो वनडे आणि टी -20 संघात स्थान मिळविण्यास दावेदार आहे. म्हणूनच संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये त्याने चांगली कामगिरी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आयापीएलमध्ये तो सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत आहे.