आयपीएलच्या मैदानात शनिवारी (०२ ऑक्टोबर) हंगामातील ४६ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स एकमेकांशी भिडले होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ४ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात दिल्लीचा शिखर धवन दुर्देवाने अवघ्या ८ धावांवर बाद झाल्याचे पाहायला मिळाले. शिखर धवनला खूप कमी वेळा धावबाद झाल्याचे पाहिले गेले आहे, पण या सामन्यात मुंबईच्या कायरन पोलार्डने मारलेल्या डायरेक्ट हिटवर तिसऱ्या पंचांनी धवनला बाद करार दिला.
मुंबईचा जयंत यादव या सामन्यात दुसऱ्या षटकात गोलंदाजी करत होता. जयंतच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शिखर धवनने एक साधारण शॉट खेळला आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. धवनने मारलेला चेंडू सरळ कायरन पोलार्डकडे जात होता आणि पोलार्डने हा चेंडू पकडला. चेंडू पकडल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता पोलार्डने चेंडू स्टंपवर फेकून मारला आणि तो अगदी निशाण्यावर लागला. सुरुवातीला धवनला तो बाद झाल्यावर विश्वास बसला नव्हता. कारण त्यानेही वेगाने आपली धाव पूर्ण केली होती. पण तिसऱ्या पंचांनी बाद करार दिल्यानंतर त्याला माघारी पवेलियनमध्ये जावे लागले.
https://twitter.com/MaHi_Shreyasian/status/1444274149455581188?s=20
दरम्यान, सामन्याच्या सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सामन्यात पंतने घेतलेला निर्णय योग्य ठरल्याचे दिसले. दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्साला अवघ्या १२९ धावांवर रोखले. मुंबईसाठी सूर्यकुमार यादवने ३३ धावा आणि क्विंटन डी काॅकने १९ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सच्या श्रेयस अय्यरने ३३ धावांची खेळी केली. त्यास आर अश्विनचही साथ मिळाल्याने दिल्लीने सामना खिशात घातला.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना मुंबई इंडियन्ससाठी खूप महत्वाचा होता. पण मुंबईने हा सामना गमावला आहे. मुंबईने ११ पैकी फक्त ५ सामने जिंकले आहेत आणि संघ अजून प्लेऑफमध्ये पोहोचला नाही. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने आधीच प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. असे असले तरी, दिल्ली अजून एका विजयासह पहिल्या दोन संघांमधील आपले स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दोन्ही पायांच्या मधून आवेशने उडवली हार्दिकची दांडी, अप्रतिम चेंडूपुढे मुंबईकर निरुत्तर-VIDEO
सीएसकेच्या स्टार क्रिकेटर रैनाची हरवली चमक! चाहते म्हणाले, “आता तू आराम करा, ‘तो’ भारी खेळेल”
स्थान एक, संघ चार; गुणतालिकेतील चौथ्या जागेसाठी काट्याची टक्कर, पाहा सध्या कोण आहे कुठे?






