भारतीय क्रिकेट संघाची इंग्लंडविरुद्ध सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या कसोटी मालिकेसाठी संघात नसलेले अनेक खेळाडू मात्र देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी खेळताना दिसत आहेत. दिल्ली संघाचा वरिष्ठ सलामीवीर शिखर धवनने आपल्या खराब फॉर्ममधून बाहेर येत महाराष्ट्रविरुद्ध दणदणीत शतक ठोकून आपण इंग्लंड विरुद्धच्या टी२० व वनडे मालिकेसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.
महाराष्ट्राविरुद्ध ठोकले शतक
विजय हजारे ट्रॉफीतील एलिट ड गटातील सामने जयपूर येथील जयपुरिया महाविद्यालयाच्या स्टेडियमवर खेळले जात आहेत. या सामन्यात दिल्लीसाठी सलामी देत अनुभवी शिखर धवनने ११८ चेंडूंमध्ये १५३ धावांची खेळी करत संघाला विजयी केले. या खेळीमध्ये २१ चौकार व १ षटकारांचा समावेश होता. धवनने या स्पर्धेच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये अनुक्रमे ०,६ व ० धावा बनविल्या होत्या.
या सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ७ गडी गमावून ३२८ धावा बनविल्या होत्या. महाराष्ट्राकडून अनुभवी केदार जाधवने ८६ तर अझीम काझी याने ९१ धावांची खेळी केली होती. मात्र, ३२९ धावांच्या लक्ष्याचा दबाव न घेता धवनने दीडशतकी खेळी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. दिल्ली संघ ड गटात खेळलेल्या चार सामन्यांत तीन विजयांसह १२ गुण मिळवून दुसऱ्या स्थानी आहे. त्यांना आत्तापर्यंत फक्त मुंबई विरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.
भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा भाग आहे धवन
मागील काही वर्षांपासून भारताच्या कसोटी संघाचा भाग नसलेला धवन मर्यादित षटकांच्या संघाचा मात्र नियमित सलामीवीर आहे. आयपीएल २०२० मध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा फटकावल्यानंतर धवनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरदेखील चांगली कामगिरी केली होती. नुकत्याच इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी घोषित झालेल्या १९ सदस्यीय भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘चांगली क्रिकेट खेळपट्टी म्हणजे काय? तिची व्याख्या काय?’, आर अश्विनने इंग्लिश पत्रकाराला फटकारले
“…आणि मराठी भाषेचा गोडवा कळत गेला” मराठी राजभाषा दिनानिमित्त सचिन तेंडुलकरचं खास ट्विट