भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज शिखर धवनने आयपीएलच्या १५व्या हंगामाच्या माध्यमातून भारतीय संघाच्या विश्वचषक संघात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. धवनला बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघात स्थान मिळवता आलेले नाही, त्यामुळे आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेत त्याचे नाव भारतीय संघात सामील होण्याची शक्यता आहे. आता धवननेच आपले इरादे स्पष्ट केलेत. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून त्याला टी२० विश्वचषकात स्थान मिळवायचे आहे.
शिखर धवन (Shikhar Dhawan) आयपीएल २०२२मध्ये पंजाब किंग्ज संघाचा भाग आहे . मेगा लिलावादरम्यान पंजाबने ८.२५ कोटी रुपये देऊन धवनला संघात सामील केले होते. त्यानंतर आता धवन २०२२च्या हंगामासाठी पंजाब संघात सामील झाला आहे आणि क्वारंटाईनमध्ये आहे. माध्यमांशी बोलताना त्याने आयपीएलमध्ये (IPL 2022) चांगली कामगिरी करून टी२० विश्वचषकाचा भाग बनण्याची इच्छा असल्याचा खुलासा केला आहे.
भारताचा ३६ वर्षीय फलंदाज धवन म्हणाला, “टी२० विश्वचषक आता लवकरच सुरू होणार आहे. मला माहिती आहे की, मी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली, तर मी संघाचा भाग होऊ शकतो. मी स्वत:साठी ध्येय ठरवत नाही, मी माझ्या खेळाचा आनंद घेतो. माझी तयारी जोरदार असेल, तर मी सर्व काही करू शकतो. मला खात्री आहे की, जर मी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली, तर मी विश्वचषक संघाचा भाग होऊ शकतो. हे होईल की, नाही हे पुढचा काळच सांगेल.”
आयपीएलबद्दल बोलताना धवन म्हणाला की, “पंजाब किंग्ज संघाशी जोडले गेल्याने मला खूप आनंद होत आहे. कारण, या संघाशी माझे चांगले नाते आहे.” त्याचबरोबर हा खेळाडू दिल्लीप्रमाणे पंजाबलाही आपले घर मानतो. धवनसाठी भारतीय संघाच्या टी२० संघात स्थान मिळवणे अजिबात सोपे नसणार आहे. सध्या संघाकडे रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या रूपाने दोन मजबूत सलामीवीर आहेत, तर युवा फलंदाज इशान किशनही आहे. अशा परिस्थितीत धवनला आयपीएलमध्ये खूप चांगली खेळी खेळावी लागेल, ज्यामुळे त्याचे संघात पुनरागमन होईल.
आयपीएल २६ मार्चला सुरू होणार असून पंजाब किंग्ज संघ २७ मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल. पंजाब संघाला धवनकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कारण, धवन संघात सलामीवीराशिवाय अनुभवी खेळाडूची भूमिका साकारताना दिसणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना २९ मे रोजी खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताविरुद्धच्या विजयासह ऑस्ट्रेलियाते सेमीफायनलचे तिकीट पक्के, इंडियाची मात्र गुणतालिकेत घसरण
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवासाठी मिताली राजने या गोष्टीला धरले जबाबदार; म्हणाली…
भारताच्या ‘या’ ३ फलंदाजांचा नादच खुळा! वनडे कारकिर्दीत एकही गोलंदाज घेऊ शकला नाही त्यांची विकेट