दुबई। सोमवारी (४ ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ५० वा सामना गुणतालिकेतील दोन अव्वल संघ म्हणजे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. शेवटच्या षटकापर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात दिल्लीने ३ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत पहिल्या २ स्थांनांमधील जागा पक्की केली आहे. दरम्यान, या सामन्यानंतर दिल्लीचा शिमरॉन हेटमायर आणि चेन्नईचा ड्वेन ब्रावो यांच्या एका कृतीने सर्वांची मने जिंकली आहेत.
सामना सुरु असताना प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये कितीही खुन्नस असली, तरी ती सामन्यानंतर विसरायची असते, याचेच उदाहरण हेटमायर आणि ब्रावोने दाखवून दिले. झाले असे की, या सामन्यात चेन्नईने दिल्लीसमोर विजयासाठी १३७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची हालत खराब झाली होती. पण, अखेरच्या क्षणी हेटमायरने अक्षर पटेलला साथीला घेत दिल्लीचा डाव सावरला होता.
तरी अखेरच्या षटकात दिल्लीला ४ चेंडूत २ धावांची गरज असताना अक्षर पटेल बाद झाला. त्यामुळे सामन्यात रोमांच निर्माण झाला होता. पण कागिसो रबाडाने चौकार ठोकत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
विजय मिळाल्यानंतर मात्र, हेटमायरने सामन्यातील प्रतिस्पर्धा विसरुन चेन्नईकडून अखेरच्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या ब्रावोच्या पाठीवर झेप घेतली. हेटमायरने केलेली ही कृती पाहून ब्रावोही हसला. त्यानेही त्याला पाठीवर उचलून धरले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ब्रावो आणि हेटमायर आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेस्ट इंडिजसाठी एकत्र खेळतात.
हेटमायरने नाबाद २८ धावा केल्या. त्यापूर्वी शिखर धवनने ३९ धावांची खेळी केली होती. चेन्नईकडून ब्रावोने १८ वे षटकही टाकले होते, ज्यामध्ये हेटमायरला १२ धावांवर जीवदान मिळाले होते. हेटमायरचा झेल कृष्णप्पा गॉथमने सोडला होता.
Nail-biting finish! 👌 👌@DelhiCapitals hold their nerve & beat #CSK by 3⃣ wickets in a last-over thriller. 👍 👍 #VIVOIPL #DCvCSK
Scorecard 👉 https://t.co/zT4bLrDCcl pic.twitter.com/ZJ4mPDaIAh
— IndianPremierLeague (@IPL) October 4, 2021
अंबाती रायडूचे झुंजार अर्धशतक
या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. चेन्नईकडून अंबाती रायडू वगळता या सामन्यात फलंदाजांनी निराशा केली. रायडूने ४३ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५५ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त रॉबिन उथप्पाने १९ धावांची खेळी केली. तर, एमएस धोनीने २७ चेंडूत १८ धावांची संथ खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त कोणालाही १५ धावांचा टप्पा पार करता आला नाही. चेन्नईने २० षटकांत ५ बाद १३६ धावा केल्या.
दिल्लीकडून अक्षर पटेलने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच एन्रीच नॉर्किए, अवेश खान आणि आर अश्विनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीच्या चेन्नईला भारी पडतायेत ‘हे’ ३ संघ, दहापेक्षा अधिक सामन्यांत मिळवलेत विजय
आयपीएलमध्ये पुन्हा तळपली ‘गब्बर’ची बॅट! ५ व्यांदा ‘असा’ कारनामा करत धवनची विराटशी बरोबरी
‘बर्थडे बॉय’ला दिल्लीकडून विजयी भेट; पंत वाढदिवशी ‘असा’ कारनामा करणारा तेंडुलकरनंतरचा दुसराच कर्णधार