गेल्या आठवड्यात टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. या संघात शिवम दुबेचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र तेव्हापासून गेल्या दोन सामन्यांत चेन्नईचा हा फलंदाज दोनदा शून्यावर बाद झाला आहे. विशेष म्हणजे, दोन्ही वेळा फिरकीपटूंनी त्याचा बळी घेतला आहे. विश्वचषक संघात समावेश झाल्यानंतर शिवम दुबे सपशेल अपयशी ठरला. तेव्हापासून त्याची बॅट शांतच आहे.
रविवारी (५ मे) पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात राहुल चहरनं दुबेला आपला बळी बनवलं. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. याआधी, 1 मे रोजी पंजाबविरुद्धच चेन्नईच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यातही शिवम दुबे पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. तेव्हा हरप्रीत ब्रारनं त्याला पायचित केलं होतं.
३० वर्षीय शिवम दुबेनं आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 171.57 च्या स्ट्राईक रेटनं 350 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटमधून तीन अर्धशतकंही निघाली आहेत. विश्वचषक संघात निवड होण्यापूर्वी शिवम शानदार फलंदाजी करत होता. मात्र गेल्या दोन सामन्यांपासून तो फिरकीपटूंसमोर सपशेल अपयशी ठरला आहे. बॅटमधून धावा काढणं तर दूरच, तो विकेटवर टिकून राहण्यासाठीही संघर्ष करताना दिसतोय.
शिवम दुबेच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं 2019 मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आतापर्यंत त्यानं 21 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 145.26 च्या स्ट्राईक रेटनं 276 धावा केल्या आहेत. या काळात त्याने आपल्या बॅटनं तीन अर्धशतकंही झळकावली आहेत. त्याच वेळी, या फॉरमॅटमध्ये शिवमची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 63 धावा आहे.
शिवम दुबेच्या नावावर 61 आयपीएल सामन्यांमध्ये 1456 धावा आहेत. आयपीएलमध्ये त्याची सरासरी ३०.९८ तर स्ट्राईक रेट १४७.८२ एवढा आहे. आयपीएलमध्ये त्यानं ९ अर्धशतकं झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
सीएसकेच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, ‘बेबी मलिंगा’ जखमी होऊन आयपीएलमधून बाहेर