शिवसेना – रायगड, राजयोग मित्र मंडळाच्या सहकार्याने दि. २४ ते २७ फेब्रुवारी २०१८या कालावधीत ” पुरुष स्थानिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे” आयोजन करीत आहे. जनरल अरुणकुमार वैद्य, पाली, सुधागड, जिल्हा रायगड येथे होणाऱ्या या स्पर्धेला महाराष्ट्र राज्य कबड्डी असो; व रायगड जिल्हा कबड्डी असो.ची मान्यता आहे.
भारताचे अवजड उधोग मंत्री मा. अनंत गीते यांच्या पाठिंब्याने होणाऱ्या या स्पर्धेत खेळाडूंवर बक्षिसांची खैरात करण्यात आली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून १६ निवडक संघांना सहभाग देण्यात येणार आहे.
या स्पर्धेकरिता ३ मॅटची क्रीडांगणे तयार करण्यात आली आहेत. क्रीडा रसिकांकरिता खास गॅलरी उभारण्यात येणार आहे. सामने सायंकाळच्या सत्रात प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येतील. गरज भासल्यास सकाळचे सत्र खेळविण्यात येईल.
अंतिम विजेत्या संघास ” शिवसेना प्रमुख चषक” व रोख रु. एक लाख अकरा हजार अकरा( ₹ १,११,१११/-) प्रदान करण्यात येतील. उपविजेत्या संघास चषक व रोख रु. सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट (₹ ६६,६६६/-) देण्यात येतील. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाच्या संघांना चषक व रोख रु. तेहत्तीस हजार तीनशे तेहत्तीस व बावीस हजार दोनशे बावीस बक्षिसादाखल देण्यात येतील.
प्रत्येक दिवसाच्या मानकऱ्यास रोख रु.५,५५५/- देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेत सर्वोत्तम ठरणाऱ्या खेळाडूस ” बजाजची प्लॅटिना मोटारबाईक” तर उत्कृष्ट चढाई व पकडीच्या खेळाडूस प्रत्येकी ” एल. इ. डी. टीव्ही ” देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेची तयारी जवळपास पूर्ण होत आली असून संघ निश्चिती झाल्यावर संघाची गटवारी जाहीर करण्यात येणार आहे.