यूएई आणि ओमानमध्ये २०२१ टी२० विश्वचषक पार पडला. यावर्षी विश्वचषकाचे जेतेपद अनपेक्षितपणे ऑस्ट्रेलिया संघाने जिंकले. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघावर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. हा सामना पाहण्यासाठी क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद अफ्रिदी आणि माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांचाही समावेश होता. दिग्गज खेळाडू शोएब मलिकने या दोघांना पार्टी दिली होती, अशात वेस्ट इंडीजचा ख्रिस गेलही या तिघांसोबत सामील झाला.
शोएब मलिकने दिलेल्या या पार्टीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ख्रिस गेल या खेळाडूंसोबत सहभागी झाला आहे. शोएब अख्तरने यावेळी गेलसोबत हिंदी भाषेत चर्चा करत मस्करी केली. अख्तत गेलला हिंदीमध्ये म्हणत आहे की, ‘आला गेल भाऊ, या ठिकाणी बस, काय हाल आहे.’ अख्तरच्या प्रश्नावर गेल हिंदीत म्हणतो की, सगळ ठीक आहे. त्यानंतर अख्तर गेलला निवृत्तीविषयी विचारतो आणि त्यावर उत्तर देताना गेल म्हणाला की निवृत्ती झाली. गेलने दिलेले हे उत्तर ऐकून उपस्थित तिन्ही खेळाडू हसू लागतात.
https://www.instagram.com/p/CWVc5XwFPUx/?utm_medium=copy_link
या पार्टीचा एक व्हिडिओ अख्तरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरूनही शेअर केला आहे, ज्यामध्ये तो म्हणत आहे की, जुन्या सहकाऱ्यांसोबत भेटून खूप मजा आली. चाहते शोएब अख्तरने शेअर केलेल्या या व्हिडिओवर रिएक्ट करत आहेत, तसेच कमेंट्सच्या सहाय्याने व्यक्त देखील होत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
दरम्यान, टी-२० विश्वचषकात गेलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर निवृत्तीची घोषणा केली होती. गेलने या सामन्यात बाद झाल्यानंतर त्याचे ग्लव्स चाहत्याला भेट दिले होते. गेल या सामन्यात डोळ्यांवर चश्मा घालून फलंदाजीसाठी आला होता. त्याने या सामन्यात ९ चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने १५ धावा केल्या होत्या. पॅट कमिंसने या सामन्यात गेलला बाद केले होते. यानंतर ड्रेसिंग रूममध्ये जाताना त्याच्या संघातील काही सहकऱ्यांनी त्याची गळाभेट घेतली होती.