एमएस धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनीच्या निवृत्तीची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण क्रिकेट जग त्याच्या जबरदस्त कारकीर्दीबद्दल त्याचे अभिनंदन करीत आहे. तसेच धोनी सोशल मीडियावर सतत ट्रेंड होत आहे.
धोनी सध्या आयपीएल २०२० च्या तयारीसाठी चेन्नईत चेन्नई सुपर किंग्सच्या सराव शिबिरात सहभागी आहे. अशा परिस्थितीत धोनीने अचानक आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतून निवृत्ती जाहीर करून सर्वांना चकित केले. त्याच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही ट्विट करुन आपल्या आठवणी शेअर केल्या आहेत.
अख्तरने एक व्हिडिओ शेअर केला असून तो व्हिडिओमध्ये धोनीच्या आठवणी सांगताना दिसत आहे. आपल्या व्हिडिओमध्ये अख्तरने म्हटले कि, आज एक काळच्या “फिनिशर” चा शेवट झाला. धोनीने आपले क्रिकेटमध्ये बरेच नाव कमावले, तसेच क्रिकेटमधेही बदल घडवुन आणला. अख्तर म्हणाला की तो धोनीचा चाहताही आहे.
धोनीने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंडविरुद्ध २०१९ च्या विश्वचषकात उपांत्य फेरीत खेळला होता. त्याच्या कारकिर्दीतील त्या शेवटच्या डावात त्याने ५० धावा केल्या होत्या. धोनीची कारकीर्द २००४ मध्ये सुरू झाली होती. धोनी पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात एकही धावा न करता धावबाद झाला होता. इतकेच नाही तर शेवटच्या सामन्यातही तो धावबाद झाला. धोनीच्या नेतृत्वात २००७ मध्ये टी-२० विश्वचषक, २०११ चा विश्वचषक आणि २०१३ मधील आयसीसी चॅम्पियनशिप जेतेपद जिंकण्याचा भारताने पराक्रम केला आहे.