मुंबई । एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. जवळपास एक वर्ष क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर त्याने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. धोनीच्या निवृत्तीनंतर माजी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने म्हटले आहे की, ‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे ढकललेला 2021 टी -20 विश्वचषक खेळण्यासाठी माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीला विनंती करू शकतात.’
आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकून देणारा धोनी, क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने 2007 चा टी -20 विश्वचषक, 2011 वनडे विश्वचषक आणि 2013 चँपियन्स ट्रॉफी जिंकली आहे. 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्या धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 350 वनडे सामने, 90 कसोटी आणि 98 टी 20 सामने खेळले आहेत; तसेच 17000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
यूट्यूब चॅनल ‘बोल वसीम’वर शोएब अख्तर म्हणाला की, ‘2021 टी -20 विश्वचषक खेळण्याचा निर्णय एखाद्या खेळाडूचा वैयक्तिक निर्णय असावा. भारतात आपल्या स्टार खेळाडूंना नेहमीच सहकार्य केले जाते. त्यांच्यावर प्रेम केले जाते. धोनी टी -20 विश्वचषक खेळू शकतो, परंतु हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. त्याने सर्वकाही जिंकले आहे. त्याला आणखी काय पाहिजे तथापि, जग त्याला लक्षात ठेवेल आणि भारतासारखा देश त्याला कधीही विसरणार नाही.’
‘पंतप्रधानांच्या विनंतीवरून धोनी भविष्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परत येऊ शकेल. उद्या पंतप्रधान त्याला कदाचीत फोन करतील आणि टी20 विश्वचषक खेळण्यासाठी विनंती करतीलही कदाचीत, हे आपणास माहिती नाही. असे देखील होऊ शकते. 1987 मध्ये जनरल झिया-उल-हकने इम्रान खानला क्रिकेट सोडू नका असे सांगितले आणि त्यानंतर तेही खेळले होते. तुम्ही पंतप्रधानांना नाही म्हणू शकत नाही,’ असे शोएब अख्तरने सांगितले.