टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे सुपर१२ सामन्यात अतिशय सुमार दर्जाचे प्रदर्शन राहिले आहे. यामुळे भारतीय संघावर चाहत्यांसोबत क्रिकेट विश्लेषकांनी देखील ताशेरे ओढले आहे. यासोबतच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एक खळबळजनक विधान केले आहे. टी२० विश्वचषक खेळणाऱ्या विराट कोहलीच्या संघामध्ये फूट पडली आहे का? विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे भारतीय ड्रेसिंग रूममध्ये तणाव निर्माण झाल्याची भीती त्याने व्यक्त केली.
शोएब अख्तर म्हणाला, ‘भारतीय संघाने या स्पर्धेत लौकीकास साजेशी कामगिरी केलेली नाही, पण कर्णधार म्हणून विराट कोहली भारतीय संघाला पुढे नेण्यासाठी मेहनत घेत आहे. अशा परिस्थितीत तो सहकारी खेळाडूंच्या आदरास पात्र आहे.’ टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला. यानंतर न्यूझीलंडनेही त्याचा ८ विकेटने पराभव केला.
एका वाहिनीशी बोलताना अख्तर म्हणाला की, ‘भारतीय संघामध्ये दोन गट आहेत. एक कोहलीसोबत, तर दुसरा त्याच्या विरोधात. ते स्पष्टपणे दिसत आहे. संघ विभागलेला दिसत आहे. हे का होत आहे हे मला माहीत नाही. कदाचित कर्णधार म्हणून त्याचा शेवटचा टी-२० विश्वचषक असेल. कदाचित कोहलीने चुकीचा निर्णय घेतला असेल, आणि हे खरे आहे. पण तो एक महान क्रिकेटर आहे आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे.’
न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघावर बरीच टीका झाली होती. भारतीय संघाच्या खराब कामगिरीवरही अख्तरने प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर तो म्हणाला की न्यूझीलंडशी सामना करण्यासाठी भारताकडे कोणत्याही योजना नव्हत्या. यामुळेच भारतीय संघाने सामना गमावला.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज पुढे म्हणाला की होय, टीका महत्त्वाची आहे. कारण भारताने न्यूझीलंडविरुद्ध खराब क्रिकेट खेळले आणि त्यांचा दृष्टिकोन चुकीचा होता. नाणेफेक हरल्यानंतर सर्वांचेच खांदे खाली झुकले होते. यामुळे भारताने केवळ नाणेफेक गमावली नव्हती तर त्याच वेळी सामनाही गमावला होता.
भारताचा पुढील सामना बुधवार (३ नोव्हेंबर) रोजी अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर अफगाणिस्तानशी होणार आहे. या सामन्यात भारताकडे चुका करायला जागा नसणार आहे. कारण जर या सामन्यात पराभव झाला, तर नंतर भारतीय संघ टी२० विश्वचषकातून बाहेर पडेल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मला आधीच माहीत होते की, ते संघर्ष करणार आहेत’, माजी दिग्गजाचे विराटसेनेवर टीकास्त्र
लाजिरवाण्या पराभवासह बांगलादेश विश्वचषकातून ‘आऊट’; नॉर्किए-रबाडाची भेदक गोलंदाजी