भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून (4 डिसेंबर) सुरुवात झाली. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली. दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्याने मोलाची कामगीरी बजावली. शेवटच्या षटकात विजयासाठी 14 धावांची गरज असताना त्याने दोन लांबलचक षटकार खेचून संघाला विजय मिळवून दिला. आता पाकिस्तानच्या माजी दिग्गज गोलंदाजाने त्याचे कौतुक करत त्याला एक सल्ला दिला आहे.
हार्दिक पंड्याने माध्यमांमध्ये सांभाळून बोलावे- शोएब अख्तर
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला की, “हार्दिक पंड्या हा एक अतिशय हुशार क्रिकेटपटू आहे. त्याने माध्यमांमध्ये स्वतः ला गप्प ठेवावे आणि सांभाळून बोलावे. ‘कॉफी विथ करण’ या टीव्ही शोमध्ये केलेल्या वक्तव्याप्रमाणे भाष्य करून ब्रँड मूल्य आणि विश्वासार्हता खराब करू नये.”
‘कॉफी विथ करण’ मध्ये केली होती वादग्रस्त टिप्पणी
चित्रपट निर्माता करण जोहरच्या चॅट शो ‘कॉफी विथ करण’ मध्ये हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी पंड्याने वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांचा तीव्र विरोध झाला होता. यानंतर त्यांना काही काळ बीसीसीआयने भारतीय संघात स्थान दिले नव्हते.
हार्दिकमध्ये उत्तम प्रतिभा
तो पुढे म्हणाला, “हार्दिकमध्ये उत्तम प्रतिभा आहे. तो एक महान क्रिकेटपटू आहे. ग्लेन मॅक्सवेलप्रमाणेच तोसुद्धा आधीच सेट होऊन येतो आणि फलंदाजी करतो. सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता त्याच्यात आहे.”
…तर भारतीय संघाने दोन्ही मालिका 3-0 अशा जिंकल्या असत्या
“भारतीय संघाने याच मानसिकतेने वनडे मालिका खेळली असती, तर त्यात नक्कीच विजय नोंदवला असता. ज्याप्रकारे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत होते. जर वनडे मालिकेआधी टी20 मालिकेचे आयोजन केले असते, तर या दोन्ही मालिका भारतीय संघाने 3-0 अशा फरकाने जिंकल्या असत्या. वनडे मालिकेचे आयोजन आधी करण्यात आले आणि भारतीय संघाची लय तुटली, हे दुर्दैव आहे.”
नवीन खेळाडू संघात आल्यास होतो आनंद
युवा वेगवान गोलंदाज टी नटराजनबद्दल बोलताना शोएब अख्तर म्हणाला की, “जेव्हा एखादा तरुण खेळाडू संघात येतो, तेव्हा आनंद होतो.”
ऑस्ट्रेलियाचा विजयी रथ रोखणे आवश्यक
ऑस्ट्रेलियाच्या संघाबद्दल बोलताना शोएब म्हणाला की, “ऑस्ट्रेलिया संघाने यापूर्वी क्रिकेटमध्ये राज्य केले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा विजय रथ रोखणे आवश्यक आहे.”
शेवटच्या टी20 सामन्यात भारत होईल विजयी
सिडनीतील तिसरा टी-20 सामना जिंकून भारत 3-0 अशा फरकाने मालिका जिंकेल, असा विश्वास शोएब अख्तरने व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या-
“नटराजन ‘या’ मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाज”, माजी दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने
रडणाऱ्या मुलाला वडील दाखवत होते भारत- ऑस्ट्रेलिया सामना, पाहा गमतीशीर व्हिडिओ
भारत- ऑस्ट्रेलिया सराव सामना: दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खराब, पुजारा शून्यावर बाद, तर रहाणे…
ट्रेंडिंग लेख-
टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू
भारताकडून २०२० मध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू; पंड्या ‘या’ क्रमांकावर
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?