आशिया चषक स्पर्धेचा गतविजेता संघ असलेल्या श्रीलंका संघाच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. आशिया चषक 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी आता फक्त 1 दिवस उरला आहे. अशात दुखापतीमुळे श्रीलंका संघातील खेळाडू आशिया चषक 2023 स्पर्धेबाहेर झाले आहेत. आधी दुष्मंता चमीरा आणि वनिंदू हसरंगा दुखापतीचा सामना करत आहेत. मात्र, आता यामध्ये आणखी दोन नावे जोडली गेली आहेत. हे 4 खेळाडू स्पर्धेत खेळणार नाहीत. यामुळे श्रीलंका संघासाठी आशिया चषकाच्या किताबाचा बचाव करणे खूपच कठीण जाईल.
आघाडीच्या क्रिकेट वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत श्रीलंका संघाचा अष्टपैलू वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga), वेगवान गोलंदाज दुष्मंत चमीरा (Dushmantha Chameera), डावखुरा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका (Dilshan Madushanka) आणि लाहिरु कुमारा (Lahiru Kumara) हे खेळाडू आशिया चषक 2023 स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. हे 4 स्टार खेळाडू आशिया चषकातील संघाचा भाग नसतील. जर हे खेळाडू संघात नसतील, तर नक्कीच संघात मजबूती पाहायला मिळणार नाही, जी मागील आशिया चषकात पाहायला मिळाली होती आणि त्याच जोरावर संघाने किताब जिंकला होता. अशात हा संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
वनिंदू हसरंगा किती संघासाठी मोठा मॅचविनर खेळाडू आहे, हे सर्वांना माहिती आहे. याव्यतिरिक्त 3 वेगवान गोलंदाजांचे दुखापतग्रस्त होणे कर्णधार दसून शनाका याच्यासाठीही चिंतेची बाब आहे. कारण, एकसोबत 3 अनुभवी वेगवान गोलंदाजांच्या दुखापतीमुळे त्यांच्या जागी इतर खेळाडू शोधणे कठीण आहे. श्रीलंका संघ त्यांचे बदली खेळाडू शोधेलही, पण प्रश्न असा असेल की, ते संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तो अनुभव आणतील का, ज्याची त्यांना गरज आहे?
श्रीलंका आहे गतविजेता
विशेष म्हणजे, श्रीलंका संघ आशिया चषक 2023 स्पर्धेत गतविजेता म्हणून उतरेल. मागील वर्षी दसुन शनाका (Dasun Shanaka) याच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघाने पाकिस्तानला अंतिम सामन्यात पराभूत करत विजेतेपद पटकावले होते. यावेळी श्रीलंका स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. आशिया चषकातील सामने पाकिस्तानव्यतिरिक्त श्रीलंकेतही खेळले जाणार आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघाचे सर्व सामने पाकिस्तानात होतील. याव्यतिरिक्त अंतिम सामनाही श्रीलंकेत होईल.
भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघातील सामना 2 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. हा सामना कँडी येथे खेळला जाईल. या स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. तसेच, आशिया चषकानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान संघ विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत आमने-सामने असतील. विश्वचषकात भारत-पाकिस्तान संघ 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये भिडतील. (shocking asia cup 2023 this cricketer joins sri lanka injured bowlers list dushmantha chameera wanindu hasaranga)
हेही वाचा-
वनडे क्रिकेटबाबत सूर्यकुमारचा मोठा दावा! आशिया चषकात सुटणार चांगल्या फॉर्मचे कोडे
गुड न्यूज! रिषभ पंत करू लागला सायकलिंग, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार वॉर्नरची कमेंट चर्चेत