पुणे। भोपाळ मध्यप्रदेश येथे झालेल्या ३० व्या सिनियर राष्ट्रीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या श्रावणी कटके हिने तायचीजेन प्रकारात रौप्य तर तायचीक्वाॅन आणि ग्रुप इव्हेन्टमध्ये तिने २ कांस्य पदक पटकाविले. सानसू प्रकारात ५६ किलो वजनी गटात पुण्याच्याच ओमकार पवार यांने कांस्यपदक मिळविले. यासोबतच सांघिक प्रकारात महाराष्ट्राचा संघ कांस्यपदकाचा मानकरी ठरला.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी वुशू असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष भूपेंद्र सिंग बाजवा, सीईओ सुहेल अहमद आणि ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे महासचिव व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे कार्यकारी सदस्य सोपान कटके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या स्पर्धेत एकूण ४४ संघ सहभागी झाले त्यात भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांव्यतिरिक्त लष्कर, हवाई दल, बीएसएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि पोलिस यांच्या संघांचा समावेश आहे. दीपक बिसेन हे महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून तर महेश इंदापूरे व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे.
तृप्ती चांडवडकर, कल्याणी जोशी, श्रावणी कटके, खुशी तेलकर, स्नेहल बडस्कर, वैभव पाटील, निखिल जाधव, कुणाल कोद्रे, अथर्व मोडक, राजमल्हार व्हटकर यांनी सांघिक प्रकारात कांस्यपदक पटकाविले. सर्व खेळाडू हे पुण्यामध्ये सोपान कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.
महत्त्वाच्या बातम्या –
एकेचाळीसावी राष्ट्रीय ज्युनियर रोईंग अजिंक्यपद स्पर्धा: महाराष्ट्राच्या पदकाच्या आशा मावळल्या
नकुल बुट्टा आणि चंद्रभागा कचरेने जिंकली सिंहगड-राजगड-तोरणा अल्ट्रा मॅरेथॉन