पुणे। पुणे ब संघाने जळगाव संघाला ३-१ असे पराभूत करताना आइज् सॉफ्टबॉल अकादमीच्या वतीने आयोजित केलेल्या १४ व्या वरिष्ठ गटाच्या सॉफ्टबॉल राज्यस्तर स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण मोहोर कन्स्ट्रक्शनचे भरत देसडला, आयकर निरीक्षक शरद मुऱ्हे व पीएमसीचे कार्यकारी अभियंता सतीश मानकामे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यावेळी शिवछत्रपती पुरस्कारार्थी दत्ता मोरे, वरिष्ठ प्रशिक्षक योगेनकुमार आशर, बाळासाहेब वागस्कर, आयकर निरीक्षक संदेश जाधव, नागेश पालकर, आइज सॉफ्टबॉल अकादमीचे सचिव राजेंद्र मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार पुणे ब संघाच्या स्वप्नील गदादे याला देण्यात आला, तर सर्वोत्तम बॅटर विनीत सपकाळ (पुणे ब), सर्वोत्तम पिचर पवन गुंजाळ (संगमनेर) यांना सन्मानित करण्यात आले.
अंतिम लढतीमध्ये पुणे ब संघाने जळगाव संघाला पराभूत केले. गणेश भराटे, विनीत सपकाळ व ऋत्विक फाटे यांनी प्रत्येकी १ होमरन करताना संघाला विजय मिळवून दिला. जळगाव संघाकडून जयेश मोरेने १ होमरन केला.
तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत जळगाव संघाने संगमनेर संघाला ३-१ होमरनने पराभूत केले. जळगाव संघाकडून धीरज बाविस्करने २ तर सुमित तळवेलकरने १ होमरन करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. संगमनेर संघाकडून अभिषेक सोनावणे याने १ होमरन केला.
उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत पुणे ब संघाने पुणे अ संघाला ८-१ होमरनने पराभूत केले. पुणे ब संघाकडून विनीत सपकाळने ३, शुभम काटकर व स्वप्नील गदादे यांनी प्रत्येकी २, केतन बनसोडे याने १ होमरन केला. पुणे अ संघाकडून समीर पांचपोरे याने १ होमरन केला.
महत्त्वाच्या बातम्या –
राष्ट्रीय वुशू स्पर्धेत पुण्याच्या श्रावणी कटकेला एक रौप्य व दोन कांस्य
एकेचाळीसावी राष्ट्रीय ज्युनियर रोईंग अजिंक्यपद स्पर्धा: महाराष्ट्राच्या पदकाच्या आशा मावळल्या
नकुल बुट्टा आणि चंद्रभागा कचरेने जिंकली सिंहगड-राजगड-तोरणा अल्ट्रा मॅरेथॉन