भारताचा दिग्गज क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने वनडेची सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन तयार केली आहे. वनडे मधील आपल्या सर्वोत्तम 11 खेळाडूंच्या यादीतून त्याने श्रेयस अय्यर आणि हॅरी ब्रूकला बाहेर ठेवले आहे. त्याने संपूर्ण टॉप ऑर्डरची जबाबदारी भारताच्या सध्याच्या तिघांवर सोपवली आहे. तसेच पुजाराने या सर्वोत्तम 11 पैकी 6 खेळाडू भारताचेच निवडले आहेत.
गेल्या जवळपास 2 वर्षांत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना जगभरात आपली छाप पाडणाऱ्या श्रेयस अय्यरला पुजाराने आपल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले आहे. दुसरीकडे हॅरी ब्रूकने नुकतेच वनडे इतिहासातील सर्वात जलद द्विशतक ठोकले होते. पुजाराने त्यालाही आपल्या संघात स्थान दिलेले नाही.
चेतेश्वर पुजाराने आपल्या सर्वोत्तम वनडे प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीची जबाबदारी शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्यावर सोपवली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली येईल. हे तिन्ही फलंदाज भारतीय वनडे संघात याच क्रमावर फलंदाजी करतात. हे तिघेही 2026 या वर्षात सर्वाधिक वनडे धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सामील आहेत. गिलने या वर्षात 895 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने 604 धावा आणि विराट कोहलीने देखील या वर्षात 552 धावा केल्या आहेत.
या वर्षात वनडेमध्ये 85 च्या उत्कृष्ट सरासरीने 680 धावा करणारा जो रूट चौथ्या क्रमांकावर येईल. याशिवाय पुजाराने मिडल ऑर्डरमध्ये के. एल. राहुल आणि वेस्ट इंडिजचा सध्याचा व्हाईट बॉल कर्णधार शाई होप यालाही स्थान दिले आहे. राहुलला मधल्या षटकांमध्ये येऊन डावाला सावरण्यात यश संपादन झालेले आहे. अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत दक्षिण आफ्रिकेचा मार्को जॅन्सन असेल, जो सध्या बहुदा आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे.
जगातील अव्वल क्रमांकाचा वनडे गोलंदाज राशिद खान आणि मिचेल सँटनर यांना डावलून पुजाराने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मुख्य फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवचा समावेश केला आहे. तर वेगवान गोलंदाजी विभागात त्याने जसप्रीत बुमराह, मॅट हेन्री आणि जेडन सील्स यांचा समावेश केला आहे.






