भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी श्रेयस अय्यर काहीही करण्यास तयार आहे. सध्या खेळल्या जात असलेल्या बुची बाबू टूर्नामेंटमध्ये त्यानं मुंबईसाठी गोलंदाजी करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. विशेष म्हणजे, अय्यर जेव्हा गोलंदाजीला आला, तेव्हा त्यानं सुनील नारायणच्या गोलंदाजी शैलीची हुबेहूब नक्कल केली!
बुची बाबू टूर्नामेंटमध्ये श्रेयस अय्यरनं तामिळनाडू संघाविरुद्ध खेळलेल्या सामन्यात गोलंदाजी केली. त्यावेळी तामिळनाडूच्या 287/5 धावा झाल्या होत्या. अय्यर 90 वं षटक टाकण्यासाठी आला. त्यानं पहिल्या पाच चेंडूंवर केवळ एक धाव दिली. मात्र शेवटच्या चेंडूवर आर. सोनू यादवनं त्याला षटकार ठोकला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तामिळनाडूनं प्रदोष रंजन पॉल (65), बी. इंद्रजित (61) आणि बुपती वैष्ण कुमार (63) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 294/5 अशी मजबूत धावसंख्या उभारली.
दुलीप ट्रॉफीमध्ये टीम ‘ड’ चा कर्णधार असलेल्या श्रेयस अय्यरनं बुची बाबू स्पर्धेतही भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. अय्यरनं गोलंदाजीत हात आजमवण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यानं यापूर्वीही देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली आहे. आयपीएलमध्ये, सुनील नारायण श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्समध्ये खेळतो.
भारतासाठी 14 कसोटी सामने खेळणाऱ्या श्रेयस अय्यरला अद्याप दीर्घ फॉरमॅटमध्ये आपलं स्थान पक्कं करता आलेलं नाही. जानेवारी 2023 पासून कसोटीच्या 12 डावांमध्ये त्यानं 17.00 च्या सरासरीने केवळ 187 धावा केल्या, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या केवळ 35 होती.
भारतानं गेल्या 10 कसोटींमध्ये मधल्या फळीत अनेक पर्याय आजमावले, ज्यात सरफराज खान आणि केएल राहुल यांचा समावेश आहे. नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन आणि न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अय्यरला देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल.
हेही वाचा –
“सचिन नंतर मी क्रिकेटचा देव आहे” भारतीय दिग्गजाचं खळबळजनक वक्तव्य! VIDEO
स्टार फुटबॉलपटू किलियन एमबाप्पेचं ट्विटर अकाऊंट हॅक! रोनाल्डो, मेस्सीवरील वादग्रस्त पोस्ट व्हायरल
भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी न्यूझीलंड ताफ्यात नव्या गोलंदाजी प्रशिक्षकाची एँट्री