आयपीएल २०२६ मध्ये चौथा सामना मंगळवारी (३१ मार्च) पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स असा खेळला गेला. या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरला हाताची दुखापत झाली. त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ही अपडेट खुद्ध अय्यरनेच दिली आहे. हंगामाच्या पहिल्याच सामन्यात अय्यरला झालेल्या या दुखापतीमुळे पंजाबच्या डगआऊटमध्ये चिंतेचे वातावरण दिसले.
सामन्यानंतर अय्यरला त्याच्या हाताच्या दुखापतीबाबत विचारले असता त्याने ही दुखापत गंभीर नाही, असे सांगितले आहे. तो हसत म्हणाला, “मी केवळ एवढच सांगू शकतो की काहीही झाले नाही. सर्व काही ठिक आहे. काहीतरी वेगळे सांगून मला अशुभ संकेत द्यायचा नाही. मला सकारात्मक राहायचे आहे आणि आशा आहे की सर्व ठिक होईल.”
अय्यरच्या या उत्तराने तो पुढील सामन्यात खेळणार असा होते. पंजाबचा पुढील सामना ३ एप्रिलला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आहे. आता त्याला ही दुखापत कशी झाली, हे जाणून घेऊ.
पंजाबच्या डावातील १२ व्या षटकात गुजरातचा फिरकी गोलंदाज राशिद खानने टाकलेला पाचव्या चेंडूवर कूपर कॉनोली याने एक उत्तम शॉट खेळला. त्याने खेळलेला हा शॉट इतक्या वेगाने होता की नॉन-स्ट्रायकरवर उभ्या असलेल्या अय्यरला सावरण्याची संधीच मिळाली नाही आणि चेंडू थेट त्याच्या हाताला लागला. त्यानंतर तो खूप वेदनेत दिसला, वैद्यकिय पथकाने लगेचच त्याच्या दुखापतीवर उपचार केले. त्यानंतर मात्र त्याची ही दुखापत किती गंभीर होती, याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
पंजाबने या सामन्यात नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये गोलंदाजांनी कर्णधार अय्यरचा निर्णय योग्य ठरवला. विजयकुमार वैशाख (३-३४), युझवेंद्र चहल (२-२८) आणि मार्को यान्सेन (१-२०) यांनी उत्तम कामगिरी केल्याने गुजरातने २० षटकात ६ विकेट्स गमावत १६२ धावा केल्या.
या सामन्यात कोनोलीने आयपीएल पदार्पण केले आणि त्याच्या अर्धशतकामुळे पंजाबने मुल्लानपूरच्या महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर १९.१ षटकात १६३ धावसंख्येचे लक्ष्य पूर्ण केले आणि हा सामना ३ विकेट्सने जिंकला.





